लोहारा : शहरातून निघणाऱ्या ओल्या कचऱ्याच्या सहाय्याने लाेहारा नगर परिषद गांडूळ खत निर्मिती करणार आहे. यासाठी मागील पंधरा दिवसांपासून घंटागाडीद्वारेच ओला व सुका कचरा स्वतंत्ररित्या संकलित केला जात आहे. परिणामी कचरा डेपाेवरील कॅरिबॅग, कागद आदी साहित्य हवेमुळे परिसरात पसरून त्रस्त झालेल्या लाेकांना दिलासा मिळाला आहे.
लोहारा शहरात ग्रामपंचायत असताना प्रमुख चौकातील साफसफाई करण्यात येत होती. हा कचरा जिल्हा परिषदेच्या बाजूला टाकला जात होता. मात्र, लोहारा शहर हे तालुक्याचे ठिकाणी असल्याने पाच वर्षांपूर्वी नगर पंचायतीचा दर्जा मिळाला. यानंतर तीन वर्षांपूर्वी नगर पंचायतीने शहरातील कचरा संकलनासाठी लातूर येथील जन आधार सेवाभावी संस्थेला काम दिले. या संस्थेकडून डाेअर-टू-डाेअर जाऊन कचरा संकलित केला जात आहे. मात्र, आजवर सुका व ओला अशा दाेन्ही प्रकारचा कचरा एकत्रितच संकलित करून ताे डेपाेवर रिचविला जात हाेता. या ठिकाणी माेठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. थाेडेबहुत वारे सुटले तरी या डेपाेवरील प्लॅस्टिक तसेच अन्य साहित्य आजुबाजूच्या परिसरात पसरत हाेते. यामुळे संबंधित लाेक प्रचंड त्रस्त झाले हाेते. दरम्यान, नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन नगर पंचायतीने ओला व सुका कचरा स्वतंत्ररित्या संकलित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मागील पंधरा दिवसांपासून काम सुरू आहे. प्लॅस्टिकसह अन्य साहित्य कचऱ्यातून बाजूला केले जात आहे. त्यामुळे डेपाेवर केवळ आणि केवळ कचराच जात आहे. दरम्यान, ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खतनिर्मिती करण्याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला आहे. या माध्यमातून पालिकेच्या उत्पन्नातही भर पडली आहे.
चाैकट...
लोहारा शहरातील डाेअर-टू-डाेअर जाऊन घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा संकलित केला जात आहे. यासाठी चार महिला, दाेन पुरुष कार्यरत आहेत. या कामाला आणखी गती दिली जाणार आहे.
-गुरुनाथ रसाळ, सुपर वायझर, जन आधार सेवाभावी संस्था.
लोहारा शहरातील घन कचऱ्यांचे वर्गीकरण करू. त्यातील प्लॅस्टिक बाजूला काढून ओल्या कचऱ्याद्वारे गांडूळ खतनिर्मिती करण्यात येणार आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यास डेपाेवर फारसा कचरा राहणार नाही. नागरिकांनीही घरातील ओला व सुका कचरा स्वतंत्ररित्या साठवावा.
-अभिजित गोरे, स्वच्छता निरीक्षक, नगर पंचायत, लोहारा