स्नेहा मोरेसेतुमाधवराव पगडी साहित्य मंच (उस्मानाबाद) : मागच्या काही काळात संदर्भमूल्य असलेले साहित्य निर्माण होत आहे, ही समाधानाची बाब आहे. याखेरीज ज्ञानाधिष्ठित समाज निर्माण करताना साहित्यिकांनी आपले आत्मचिंतन केले पाहिजे. त्याचप्रमाणे, एकविसाव्या शतकातील लिखाणाचा आढावा घेतानाच साहित्यिकांनी वाचकांची वाचन भूक ओळखावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक श्रीराम शिधये यांनी केले.
९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘एकविसाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या मराठी साहित्यात वाचण्यासारखे काय आहे?’ या विषयावर शनिवारी परिसंवाद झाला. यावेळी अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते.
शिधये म्हणाले, मागील काही काळात ज्या पुस्तकांकडे आपण आपोआप ओढले जात आहोत, त्याचे नेमके कारण काय, याचे विश्लेषण केले पाहिजे. सध्याच्या वाचकाची वाचन भूक काय आहे, हे साहित्यिकांनी ओळखले पाहिजे.
या विषयाची मांडणी करताना डॉ. दत्ता घोलप म्हणाले, कादंबरीच्या विश्वात मागच्या दशकात अधिक वास्तविकता डोकावू लागली आहे. नवी शैली, नवी भाषा आणि नवी धाटणी या रुपात कादंबरी लेखन वाचकांच्या भेटीला येत आहे, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. कथेविषयी विशद करताना डॉ. केशव तुपे म्हणाले, कथा लेखनाला वेगळी परंपरा आहे. परंतु, मागच्या ५० वर्षात ही खंडित झाली आहे. कथा लिखाण हे वंचिताचे वंशज आहे. मागच्या काही काळात प्रणव सखदेव, जयंत पवार, बालाजी सुतार यांनी वेगळ्या धाटणीचे लिखाण केले आहे. आपण सर्व साहित्याच्या केंद्रस्थानी माणूस आल्याने निसर्गलिखाण काहीसे कथाप्रकारात दुर्लक्षित राहिले.लिखाणाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा धोकावाचन संस्कृती लयाला जातेय अशी ओरड होत असताना दुसरीकडे उदंड साहित्याची निर्मिती होते आहे. मात्र, साहित्य लिखाणाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा धोका निर्माण झाला आहे. - प्रा. संतोष गोनबरेसमीक्षकांची पुरेशी संख्या नाही ही दुबळी बाजूज्यांनी सौंदयार्वादी कविता लिहिली, त्यांनी पुढे वास्तववादी लिखाण केले आहे. हा बदल आश्वासक आणि आव्हानात्मक आहे. कवींची संख्या वाढत असली तरी दुसऱ्या बाजूला समीक्षकांची संख्या पुरेशी नाही ही दुबळी बाजू आहे. - डॉ. पी. विठ्ठल