कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यास सुरुवात झाल्यानंतर ती घेण्यासाठी फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, दुसरी लाट आल्यानंतर ज्या गतीने कोरोनाचा उद्रेक झाला, ते पाहता लसीसाठी आता रांगा लागू लागल्या आहेत. अगदी पहाटेपासून लसीकरण केंद्राबाहेर ज्येष्ठ नागरिक लसीची वाट पाहत बसत आहेत. दरम्यान, अनेक ज्येष्ठांना आता लसीचे डोस मिळाले आहेत. मात्र, १८ ते ४५ वयोगटातील लसीकरण थांबविण्यात आल्याने आपल्या कुटुंबातील या वयोगटातील सदस्यांना लस कधी मिळणार याची चिंता त्यांना सतावत आहे. विविध व्यवसाय, नोकरी, अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या या तरुणांना लवकरात लवकर लस मिळणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले आहे. मात्र, लसींचा पुरवठा कधी सुरळीत होणार, याचा नेम नसल्याने आणखी काही दिवस किंबहुना महिनेही वाट पाहावी लागणार आहे.
तरुण कामानिमित्त बाहेर जातात, त्यांनाही लवकर लस मिळावी...
मला लस मिळाली. मात्र, माझा एक मुलगा नोकरी करतोय, तर दुसरा शिक्षण घेत आहे. दोघेही बाहेर वास्तव्याला आहेत. त्यांची चिंता लागून असते. त्यांना लवकर लस मिळावी, अशी अपेक्षा आहे.
-शेख, जुनोनी
माझा एक मुलगा पेट्रोलपंपांचा व्यवस्थापक आहे. दुसरा शेती करतो. दोघांनाही सध्या त्यांच्या कामानिमित्त बाहेर जावेच लागते. अनेकांशी संपर्क येतो. त्यामुळे स्वाभाविकच त्यांची काळजी लागून राहते.
- सुभाष सोनटक्के, भूम
मला लस मिळालेली आहे. मात्र, माझ्या दोन तरुण मुलांना अजून नाही. एकजण व्यवसाय करतो. दुसरा शिक्षण घेतोय. कामानिमित्त बाहेर जाणे-येणे असते. त्यांनाही लवकर लस मिळणे गरजेचे आहे.
- विजय अंधारे, माणकेश्वर
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण
ज्येष्ठ : पहिला डोस - ७९०११, दुसरा डोस - १६३३९
४५ ते ५९ : पहिला डोस - ५७९३४, दुसरा डोस - ५६०५
१८ ते ४४ : पहिला डोस - ११९४९, दुसरा डोस - ००