कळंब -मागील काही दिवसांपासून कळंब शहर व तालुक्याचा कोरोनाबाधितांचा पाॅझिटिव्हिटी दर कमी होत असल्याने नागरिकांमधील घबराटीचे वातावरण कमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठेवरील निर्बंधही आता शिथिल करण्याची व्यापाऱ्यांची मागणी पुढे आली आहे. त्यामुळे प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
मागील दोन-तीन महिने कोरोनाने कळंबकरांना चांगलेच बांधून ठेवले होते. कोरोना संसर्गाचा पाॅझिटिव्हिटी दर आटोक्यात येत नसल्याने व मृत्यूदर वाढल्याने आरोग्य यंत्रणेचीही धावपळ उडाली. त्यातच कळंब येथे अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा, कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे अनेकदा रुग्ण उस्मानाबाद, लातूर, बार्शी, अंबाजोगाई आदी ठिकाणी रेफर करावे लागले. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, रुग्णवाहिका मिळविण्यासाठीही कसरत करावी लागली.
या सगळ्या संकटानंतर आता रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही दिलासा देणारी बाब समोर येत आहे. गुरुवारी आरोग्य विभागाने केलेल्या आरटीपीसीआर तपासणीत ५५ पैकी १२, तर रॅपिडच्या ६०८ पैकी ३२ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये पाॅझिटिव्हिटी दर कायम असला तरी रॅपिड चाचण्यांमध्ये तो कमी दिसतो आहे.
मागील काही दिवसांत मृत्यूदरही कमी होताना दिसत असला तरी दुसऱ्या लाटेत तब्बल शंभर जणांना जीव गमवावा लागला, हेही खरे आहे. पहिल्या लाटेपेक्षा ही संख्या जवळपास दुप्पट असल्याचेही समोर आले. त्यामुळे दुसरी लाट ओसरत
असल्याच्या भावनेमुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून बंद असलेल्या बाजारपेठेवरील निर्बंध काहीसे शिथिल करावेत, अशी मागणी आता व्यापारी वर्गातून पुढे येत आहे. शासनाने आता १५ जूनपर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे. कोरोनाचा धोका अजून पूर्णपणे संपला नाही व तज्ज्ञ तिसऱ्या लाटेचे संकेत देत आहेत. त्यामुळे बाजारपेठ खुली करण्याबाबत प्रशासन ठोस पावले उचलत नसल्याचे चित्र आहे.
चौकट -
व्यापाऱ्यांच्या वतीने बलाई यांचा पुढाकार
कळंब शहरातील व्यापाऱ्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन केले. कोरोना संसर्गाचा धोका संपला नसल्याने कोरोनाबाबतचे नियम पाळूनच उद्योग, व्यवसाय सुरू राहणार आहेत. सध्या प्रशासनाने अत्यावश्यक सेवा ठराविक वेळेत चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. याबरोबरच इतर दुकाने त्याच कालावधीत उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी येथील व्यापारी आनंद बलाई यांनी व्यापाऱ्यांच्या वतीने प्रशासनाकडे केली आहे.
अनेक व्यापाऱ्यांना उदरनिर्वाहाचे इतर साधन नाही. अनेकांना उपासमार सहन करावी लागत आहे. कोरोनाचे नियम पाळून निर्धारित वेळेत त्यांना दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली, तर त्यांना दिलासा मिळेल व त्यांची उपासमार टळेल, असेही बलाई यांनी निवेदनात म्हटले आहे. बलाई यांनी शहरातील व्यापाऱ्यांच्या वतीने केलेली ही शिष्टाई फळाला यावी, अशी अपेक्षा व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
चौकट -
जिल्हा प्रशासन निर्णय घेईल -उपविभागीय अधिकारी
कोरोनाचा संसर्ग दर कमी झाला आहे; पण संपला नाही. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना सर्व बाजूने विचार करावा लागेल. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सुरू करण्याबाबत अजून कोणत्याही सूचना वरिष्ठ कार्यालयातून मिळाल्या नाहीत; पण परिस्थिती पाहून त्या दुकानांना ठराविक वेळेत उघडण्यासाठी परवानगी मिळू शकेल; पण तूर्तास त्याबद्दल सांगता येणार नाही, अशी माहिती उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी दिली.
चौकट -
कोट्यवधींची उलाढाल ठप्प!
कापड, किराणा, अडत, सोने-चांदी या खरेदीसाठी आजूबाजूच्या जिल्ह्यातील ग्राहकांची कळंब बाजारपेठ पहिल्या पसंतीची ठरली आहे. मागील जवळपास दीड वर्षापासून कोरोनाने या बाजारपेठेला कोट्यवधीचा फटका बसला आहे. या बाजारपेठेवर अवलंबून लहान-मोठे व्यापारीही हतबल झाले आहेत. हे चित्र कधी बदलेल, याकडे आता बाजारपेठेचे लक्ष लागले आहे.