उस्मानाबाद : कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने जून महिन्यापासून निर्बंध शिथिल करण्यात आले. एसटी बसेसही ग्रामीण तसेच शहरी भागात पूर्ण क्षमतेने धावू लागल्या आहेत. मात्र, शाळा सुरू नसल्याने अद्याप ४० टक्के मुक्कामी बसेस बंदच आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातून शहरात नोकरी, तसेच व्यवसाय करण्यासाठी अनेकांना मुक्कामी बससेचा आधार होता. उस्मानाबाद आगारातून १२ बसेस मुक्कामी जात होत्या. या बसने सकाळी शहरात येणे व शहरातून रात्री गावी जाणे सोईस्कर होत होते. मात्र, कोरोना संसर्गामुळे मुक्कामी बसेला ब्रेक लागला. जून महिन्यात रुग्णांची संख्या कमी झाल्याने बसेस धावू लागल्या आहेत. १२ पैकी ७ बसेस मुक्कामी जात आहेत, तर ५ बसेस अद्याप बंदच आहेत.
ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्यांतही जागा मिळेना
उस्मानाबाद स्थानकातून शहरी तसेच ग्रामीण भागात बसेस धावू लागल्या आहेत. शहरी भागातील बसेसला गर्दी होत आहे. मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्यांतही जागा मिळत नाही.
शहरी भागात जाणाऱ्या गाड्या फुल्ल
उस्मानाबाद येथून मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, हैदराबाद, सोलापूर, लातूर या मार्गांवर बसेस धावू लागल्या आहेत.
लांब व मध्यम पल्ल्याच्या बसेसला प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. राखी पौर्णिमा सणाला प्रवासीसंख्या वाढली होती.
उस्मानाबाद स्थानकातून लातूर, सोलापूर मार्गांवरील बस गाड्यांना गर्दी होत आहे. त्यामुळे या मार्गांवर फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
मुक्कामी जाणाऱ्या पाच गाड्यांचे काय?
उस्मानाबाद आगारातून मुरुड, येवती, टाकळी, मुळेवाडी, वैराग या ठिकाणी मुक्कामी जाणाऱ्या बसेस कोरोना संसर्गामुळे बंद होत्या. अद्यापही या बसेस सुरू झालेल्या नाहीत.
मुक्कामी गाडी येत नसल्याने त्रास
शासकीय कार्यालयांत काही काम असले की सकाळी घरातून लवकर निघावे लागते. मात्र, त्याकरिता मुक्कामी असलेल्या बसचा फायदा होत होता. ती सकाळी उस्मानाबादेत पाोहोतच होती. मात्र, बस बंद असल्यामुळे आता खासगी प्रवासी वाहन करून यावे लागत आहे.
अनिल पाटील, प्रवासी
शहरात कामानिमित्त आल्यास रात्री गावी जाण्यास उशीर होतो. मुक्कामी बस असल्यामुळे त्या गाडीची वेळ माहिती असायची . त्या वेळेत स्थानकात गेल्यास बस मिळायची, ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना बसचा आधार होता. मात्र, मुक्कामी बस नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे.
तुकाराम गाडे, प्रवासी
कोट...
कोरोना संसर्गामुळे आगाराच्या १२ मुक्कामी बसेस बंद होत्या. त्यापैकी ७ बसेस सोडण्यात आल्या आहेत. ५ बसेस बंद आहेत. या मार्गांवर प्रवाशांचा प्रतिसाद नसल्यामुळे बसेस बंद आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर या बसेसही सुरू होतील.
पांडुरंग पाटील, आगारप्रमुख, उस्मानाबाद