बालाजी आडसूळ
कळंब : तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा वारू उधळला आहे. यामध्ये काही ठिकाणी महाविकास आघाडी आकाराला येत आहे. तर काही गावात पक्षाचे जोेडे बाजूला सारत ‘समविचारी’ गावपुढाऱ्यांनी एकीची मोट आवळल्याचे दिसून येत आहे.
जुलै ते डिसेंबर २०२० दरम्यान मुदत संपलेल्या तालुक्यातील निवडणूक पात्र अशा ५९ गावांचा निवडणूक कार्यक्रम राबवला जात आहे. यानुसार आगामी १५ जानेवारी रोजी तालुक्यातील ८४ हजार मतदार ५९ ग्रामपंचायतीच्या १८८ प्रभागातील ४९५ सदस्यांना निवडून देणार आहेत. या टप्यात तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या अशा ग्रामपंचायतीचा समावेश असल्याने गावगाड्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. गावागावात सरपंच पदाला गवसणी घालत, गावचे कारभारी होण्यासाठी डावपेच रंगात आले आहेत. या डावातील ‘पट’ कोठे राजकीय पक्षांचा आधार घेत तर कुठे गावपातळीवरील ‘समविचारी’ सहकाऱ्यांची मोट आवळत मांडला जात आहेे.
तालुक्यात शिवसेना व राष्ट्रवादी हे पारंपरिक प्रतिस्पर्धी पक्षाचे कार्यकर्ते फडात तर आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजपलाही गावगाड्यात बळ आहे. शिवाय काँग्रेसही तग धरून आहेच. यामुळे एकूणच यंदा गावच्या राजकारणाचा नूरच बदलणार असल्याचे संकेत आहेत. कुठे ‘घड्याळ’ बांधलेल्या ‘हाताने’ चांगलाच ‘धनुष्याचा’ वेध धरला आहे. तर कोठे ‘कमळ’ फुलवण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी स्वबळ आजमावले आहेे. काही गावात आघाडीत ‘बिघाडी’ झाल्याचे तर काही गावात भाजपाची ‘कोंडी’ केल्याचे सध्या दिसून येत असले तरी खरे चित्र नव्या वर्षाच्या प्रारंभीच दिसणार आहे.
चौकट
मोठ्या गावात, मोठ्या लढती
तालुक्यातील या टप्प्यातील सर्वात मोठी ईटकूर ग्रामपंचायत आहे. तर या खालोखाल येरमाळा, मंगरूळ या ग्रामपंचायती आहेत. या गावात शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस दखलपात्र आहेत. येथे भाजपा विरूद्ध महाविकास आघाडी असेे चित्र आकारास येत आहे. यामुळे येथे अशीच स्थिती राहिल्यास रंगतदार लढती, बंडखोरी पहावयास मिळणार आहे.
‘दादा’ मंडळीचे विशेष लक्ष
निवडणुका होत असलेल्या तालुक्यातील ५९ गावात खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील, तुळजापूरचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा संपर्क दखलपात्र आहे. कार्यकर्त्यांसाठी प्रिय असलेल्या या ‘दादा’ मंडळीचे तालुक्यात विशेष लक्ष असणार आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. श्रीधर भवर, शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजी कापसे, भाजपाचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार यांनीही ग्रामपंचायत निवडणुकीवर विशेष लक्ष दिले आहे.