धाराशिव - आपल्या पक्षाचे आमदार साेबत नसल्याचे लक्षात आल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यानंतर कायदेशीर मार्गाने आमचे सरकार अस्तित्वात आले. सर्वाेच्च न्यायालयानेही गुरूवारी त्यावर शिक्कामाेर्तब केले. त्यामुळे आमच्या सरकारने राजीनामा देण्याचा प्रश्न येताेच कुठे? अशा शब्दात भाजपाचे प्रदेधाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विराेधकांवर घणाघात केला. तसेच राज्यातील सत्तासंघर्षावरील सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे त्यांनी स्वागत केले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे गुरूवारी जिल्हा दाैर्यावर आले असता, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांच्यासमवेत भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजीतसिंह ठाकूर हेही उपस्थित हाेते. बावनकुळे म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर त्यांच्यास शिवसेना पक्षातील आमदारांनी अविश्वास दाखविला. आपलेच आमदार आपल्यासाेबत नसल्याचे लक्षात आल्यानंतर स्वत: ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राज्याच्या हिताच्या दृष्टिकाेनातून हे पद फारकाळ रिक्त ठेवता येत नाही. त्यामुळे सर्व कायदेशीर बाबींचे पालन करून आमचं शिंदे-फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आले. कायदेशीर मार्गाने आलेल्या या सरकारवर विराेधक नेहमी ‘खाेके सरकार’ म्हणून टिका करीत हाेते. एवढेच नाही तर आमच्या सरकारच्या विराेधात उध्दव ठाकरे सर्वाेच्च न्यायालयात गेले हाेते. या सत्तासंघर्षावर गुरूवारी सर्वाेच्च न्यायालयाने आपला महत्वपूर्ण निकाल दिला. निकालात निरीक्षणे काहीही नाेंदविली असली तरी एकनाथ शिंदे हे कायदेशीर पद्धतीनेच मुख्यमंत्री झाले आहेत, यावर शिक्कामाेर्तब केल्याचे सांगत न्यायालयाच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले.