परंडा (जि. उस्मानाबाद) - पंजाबमधील पठाणकाेट येथे कर्तव्य बजावताना परंडा तालुक्यातील साेनारी येथील सागर पद्माकर ताेडकरी (वय ३१) यांना रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वीरमरण प्राप्त झाले. शहीद जवान ताेडकरी यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी १० वाजता पुणे तर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास साेनारी येथे दाखल हाेणार आहे.
शहीद जवान सागर ताेडकरी यांचे प्राथमिक शिक्षण साेनारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण परंडा शहरातील महात्मा गांधी विद्यालयातून पूर्ण केले. रा. गे. शिंदे महाविद्यालयातून बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले. तर बार्शी येथून ‘बीसीए’चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तयारी केली असता, २०१० मध्ये ते सैन्य दलात दाखल झाले. नागपुरातील कामटी येथून ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर त्यांना १५ कार्ड बटालीयनमध्ये पदस्थापना मिळाली. यानंतर प्रारंभी त्यांनी अहमदनगर, पंजाब, जम्मू काश्मीर येथे सेवा बजावल्यानंतर सध्या ते पंजाबमधील पठाणकाेट येथे कार्यरत हाेते.
दरम्यान, रविवारी ते गस्तीवर असताना साधारपणे सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वाहनास अपघात हाेऊन त्यांना वीरमरण प्राप्त झाले. मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास शहीद जवान सागर ताेडकरी यांचे पार्थिव पुणे येथे येईल. यानंतर साधारणपणे दुपारी २ वाजेच्या सुमारास साेनारी येथे पार्थिव दाखल हाेईल. शहीद जवान ताेडकरी यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, गावचे सुपूत्र सागर ताेडकरी यांना वीरगती आल्याची वार्ता समजताच साेनारी, खासापुरीसह पंचक्राेशीतील गावांवर शाेककळा पसरली.