कळंब (जि.धाराशिव) : गावाकडील नातेवाईकांचे लग्नकार्य, देवकार्य उरकून बार्शी येथे दगड फोडणीच्या कामावर जात असलेल्या काका-पुतण्याचा खामगाव शेगाव पालखी मार्गावरील आंदोरा गावालगत कारने उडवल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
नांदेड जिल्ह्यातील लोहा व अर्धापूर तालुक्यातील काही कुंटूब बार्शी (जि. सोलापूर) येथे दगड फोडणीचे काम करतात. हे कुंटूब नातेवाईकांच्या लग्न, देवकार्यासाठी गावाकडे गेले होते. यानंतर रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ते गावाकडून बार्शीकडे मार्गस्थ झाले. यापैकी माधव पुर्बा दासे (२७, रा. कामटा बु. ता. अर्धापूर जि. नांदेड) व शिनू उत्तम दासे (१६, रा. कापसी (कु) ता. लोहा जि. नांदेड) हे काका-पुतणे त्यांच्याकडील दुचाकीवरून कळंबमार्गे जात होते.
यावेळी खामगाव-शेगाव राष्ट्रीय महामार्गावरील आंदोरा गावालगत त्यांच्या दुचाकीला मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कारने ठोकरले. यात दुचाकीवरील शिनू दासे यांचा जागीच तर माधव दासे यांचा धाराशिव येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयताचे कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सोमवारी दुपारी मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले.