उस्मानाबाद : अवैधरित्या वाळू वाहून नेण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून दोघांनी मिळून कनिष्ठ अव्वल कारकुनास धक्काबुक्की केल्याची घटना गुरूवारी पहाटे पावणेदोन वाजेच्या सुमारास तांदुळवाडी शिवारात घडली. या प्रकरणी संबंधित दोघांविरूद्ध आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
परंडा तलाुक्यातील शेळगाव ते तांदुळवाडी या मार्गावरून ट्रॅक्टरद्वारे अवैधरित्या वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती कनिष्ठ अव्वल कारकुन नरसिंग नारायण ढवळे यांना मिळाली. लागलीच त्यांनी साक्षीदारांसोबत तांदुळवाडी शिवारात धाव घेत वाळू वाहून नेणारे ट्रॅक्टर आडविले. यावेळी वाळू तस्कर नारायण खरसडे याने ‘ट्रॅक्टर आडविणारे तुम्ही कोण?’, असा सवाल करीत ढवळे व त्यांच्यासोबत असलेल्या साक्षीदारांना धक्काबुक्की केली.
या प्रकरणी ढवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायण खरसाडे व त्याच्यासोबत असल्या सोन्या नामक व्यक्तीविरूद्ध आंबी पोलीस ठाण्यात भादंविचे कलम ३७९, ३५३, ३२३, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरील प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.