गेल्या काही वर्षांपासून शहरात ‘बॅनरचा ट्रेंड’ वाढला आहे. सण-उत्सव, जयंती तसेच वाढदिवस यांच्या शुभेच्छा देण्यासाठी विशिष्ट अशा दिवशी किंवा त्याअगोदरचे काही दिवस जागोजागी लागणारे बॅनर लक्ष वेधून घेत आहेत. पालिकेने परवानगी घेऊन हे बॅनर लावले जात असल्याचे सांगण्यात येते, परंतु शहरात विनापरवाना बॅनर लावून जाहिरातबाजी करण्याचे प्रकारही घडत आहेत. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे.
या ठिकाणांकडे कोण लक्ष देणार?
शहरातील प्रमुख चाैकांमध्ये तसेच वर्दळीच्या परिसरात बॅनर लावण्याची स्पर्धा रंगत असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. एकच बॅनर चार ते पाच दिवस किंवा त्यापेक्षा अधिक काळ त्याच ठिकाणी राहते.
छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, राजमाता जिजाऊ चौक यासह शहरातील विविध रस्त्यांवर बॅनर लावले जातात. बऱ्याच ठिकाणी रस्त्यांना लागून बॅनर लावले जात असल्याने वाहतुकीला अडचणी येतात. यातून किरकोळ अपघात झाले असल्याचे प्रकारही घडले आहेत.
कायद्यानुसार होते कारवाई..
अनधिकृतपणे बॅनर व पोस्टर लावणाऱ्यांवर महाराष्ट्र मालमत्तेच्या निरुपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ अंतर्गत कारवाई केली जाते. अनधिकृतपणे बॅनर लावणाऱ्यावर दंडात्मक कारवाईसह फाैजदारी कारवाईची तरतूद या अधिनियमात आहे.
बॅनर लावून सार्वजनिक जागी विद्रुपीकरण करणाऱ्याकडून मालमत्ता कराची थकबाकी वसुली तातडीने करण्याचा अधिकारी पालिका प्रशासनाला अधिनियमांतर्गत प्राप्त आहे.
कोट....
बॅनर लावण्यासाठी पालिका प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. २ ते ३ दिवसांपेक्षा अधिक बॅनर न हटविल्यास १ हजार रुपयांचा दंड किंवा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. शहरातील बॅनर हटविण्याबाबत सूचना केल्या आहेत.
हरिकल्याण यलगट्टे, मुख्याधिकारी नगर परिषद, उस्मानाबाद