- चेतन धनुरेधाराशिव : धाराशिव ही राष्ट्रवादीतील तीन दिग्गज नेत्यांची सासुरवाडी आहे. एका जावयाने वेगळी चूल मांडून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता उरलेले दोन जावई काय भूमिका घेतात, आपल्या राजकीय गुरूंच्या आश्रयालाच राहतात की साडूभाऊंना टाळी देतात, याकडे धाराशिव जिल्ह्यासह राज्याचेही लक्ष लागले आहे.
विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे व माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादीतील तीन दिग्गज नेते. या सर्वांचीच सासुरवाडी धाराशिव जिल्ह्यातील आहे. अजित पवार यांची सासुरवाडी तेर असून, ते माजीमंत्री व राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य राहिलेल्या डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी सुनेत्राताईंचे मिस्टर. तर राजेश टोपे यांची सासुरवाडी उपळा. तेरपासून जवळच असलेल्या या उपळ्यातील पडवळ कुटुंबाचे ते जावई. प्राजक्त तनपुरे हे ढोकीतील देशमुख कुटुंबाचे जावई आहेत. तिघांचीही सासुरवाडी अवघ्या १५ किमीच्या परिघातील. त्यामुळे धाराशिवकरांसाठी तरी एकार्थाने हे तिघेही साडूभाऊच. आता यातील अजितदादांनी त्यांचे काका तथा राजकीय गुरू खा. शरद पवार यांची साथ सोडत भाजप-सेनेसोबत हातमिळवणी केली; मात्र त्यांचे साडूभाऊ राजेश टोपे व प्राजक्त तनपुरे यांनी मात्र अजूनही आपले पत्ते ओपन केले नाहीत.
सोनाली तनपुरे यांचा शरद पवारांना पाठिंबा प्राजक्त तनपुरे यांच्या अर्धांगिनी सोनाली तनपुरे यांनी समाजमाध्यमांवर खा. शरद पवार यांना पाठिंबा दर्शविणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. पाठोपाठ खा. अमोल कोल्हे यांनी शरद पवारांची बाजू घेतल्याने त्यांचे कौतुक केले. यातच मंगळवारी प्राजक्त तनपुरे यांनी अजितदादांची भेट घेतली; मात्र ती कशाबाबत घेतली, याविषयीच्या बातम्यांत तथ्य नसल्याचे सोनालीताईंनी जाहीर केले. यावरून तनपुरे कुटुंबाचा राजकीय कल लक्षात येत असला, तरी कालचा दिवस हा आज नसतो, हेही तितकेच खरे.