खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर : ‘स्केल ऑफ फायनान्स’प्रमाणे कर्जपुरवठ्याच्या सूचना
कळंब : शेतीला पुरेसा अन् वेळेवर कर्जपुरवठा होत नसल्यानेच शेती विकास होत नाही. शेतकऱ्यांवर सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ येते. शेतकऱ्यांनाच कर्जवाटप करताना एवढी कंजुषी कशासाठी, असा सवाल करत सर्व बँकांनी ‘स्केल ऑफ फायनान्स’प्रमाणे कर्जपुरवठा करावा, अशा सूचना खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केल्या.
येथील पंचायत समिती सभागृहात सोमवारी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील यांनी खरीप कर्जवाटप आढावा बैठक घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, तहसीलदार रोहन शिंदे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी नीलेश विजयकर, गटविकास अधिकारी एन. पी. राजगुरू, सहायक निबंधक विकास जगदाळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, पं. स. उपसभापती गुणवंत पवार यांच्यासह तालुक्यातील सर्व बँकाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सहायक निबंधक कार्यालयाचे अधीक्षक मेजर पुरी यांनी प्रास्ताविक केल्यानंतर खा. राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील यांनी खरीप हंगामासाठी केलेल्या बँकनिहाय कर्जवाटपाची स्थिती जाणून घेतली. तसेच शेतकरी, बँक कर्मचारी व सहकार, महसूल प्रशासनाचे अधिकारी यांच्याशी संवाद साधत येणाऱ्या अडचणींवर चर्चा केली. यावेळी मस्सा, शिराढोण, आथर्डी, वाकडी (के) आदी गावांतील शेतकऱ्यांनी बँका कर्जवाटपात अडवणूक करत असल्याच्या तक्रारी केल्या. खासदार, आमदार यांनी मागणी केलेला एकही शेतकरी कर्ज वाटपापासून वंचित राहू नये, अशी आग्रही मागणी बँक व्यवस्थापनाकडे केली.
चौकट...
‘स्केल ऑफ फायनान्स’ दर्शनी भागावर लावा
यावेळी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रत्येक बँकांनी शेतकऱ्यांना देय असलेला ‘स्केल ऑफ फायनान्स’ आपल्या शाखेतील दर्शनी भागात लावावा. यामध्ये पीक, क्षेत्र नमूद करावे. आगामी पाच दिवसांच्या आत हे करावे. सहायक निबंधक यांनी यासंबंधी जीओ टॅगिंग करून फोटोसह अहवाल सादर करावा. निर्धारित वित्तीय मर्यादेनुसार कर्जपुरवठा होतोय का, याची खातरजमा करावी असे, असे सूचित केले.
जिथे शेतकऱ्यांना मान, तेथे शासकीय खाती...
यावेळी आ. कैलास पाटील यांनी तीन लाखांपर्यंतच्या व्याज सवलत योजनेची अंमलबजावणी करावी, असे सांगत जी बँक जास्तीत शेतकऱ्यांना कर्ज देते, त्याच बँकेत शासनाच्या विविध विभागाची खाती असावीत, असे सुचविले. यावेळी सध्या अशी खाते असलेल्या बँकेसंदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आली. यानंतर खा. राजेनिंबाळकर यांनीही यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करून ज्या बँकेत शेतकऱ्यांना अधिक कर्जवाटप करण्यात येईल, तेथेच शासकीय खाती ठेवावीत, अशी मागणी करण्यात येईल, असे सांगितले.
▪️लक्षवेधी मुद्दे
या बैठकीस काही व्यवस्थापकांनी स्वतः दांडी मारत आपले दूत पाठवले होते. यासंबंधी विशेषतः शिराढोण शाखेच्या व्यवस्थापकांची झाडाझडती घेण्यात आली.
यावेळी चांगले काम करणारे आंदोऱ्याचे दिनेश बिवन, कळंबचे सतीश यांच्यासह मोहा, खामसवाडी येथील बँक व्यवस्थापनाचे कौतुक करण्यात आले.
यावेळी सहायक निबंधक यांना बँकांची संख्या, तर बँकांच्या प्रतिनिधींना दत्तक गावे सांगता आली नाहीत.