उस्मानाबाद : भाजपचे उस्मानाबाद पालिकेतील स्वीकृत सदस्य व्यंकटेश कोरे यांनी नुकताच राजीनामा देऊ केला आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता त्यांच्या ठिकाणी नव्या चेहऱ्यास संधी देताना भाजपची मोठीच कसरत होणार असून, येत्या ३० मार्च रोजी सदस्य निवडीसाठी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी सभा बोलाविली आहे.
उस्मानाबाद नगरपालिकेतील भाजपचे स्वीकृत सदस्य व्यंकटेश कोरे यांना संधी देताना त्यांचा कालावधीही ठरवून घेण्यात आला होता. हा कालावधी संपल्यानंतर त्यांनी १ मार्च रोजी आपल्या पदाचा राजीनामा देऊ केला आहे. ही जागा रिक्त झाल्याने त्या ठिकाणी नूतन सदस्याच्या निवडीसाठी बैठक घेण्याबाबात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पालिकेला अवगत करण्यात आले होते. याअनुषंगाने नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी ३० मार्च रोजी सर्व सदस्यांची बैठक बोलाविली आहे. ही जागा भाजपच्या कोट्यातील आहे. मागच्या वेळी अनेकांनी आपली वर्णी लागावी यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र, त्यात कोरे यांनी बाजी मारली होती. मात्र, यामुळे स्पर्धेत असलेले व शेवटच्या टप्प्यात नाव मागे पडलेले अनेक जण नाराज झाले. मात्र, त्या वेळी त्यांना पुढच्या टर्मला संधी देण्याचा शब्द देऊन नाराजी काढण्यात आली होती. त्यामुळे आता या वेळी तेव्हाच्या नाराजांपैकी कोणाच्या गळ्यात हे पद पडते की आगामी पालिका निवडणुका लक्षात घेऊन नवीन चेहरा समोर आणला जातो, याबाबत कार्यकर्त्यांत उत्सुकता आहे.