उस्मानाबाद : कोरोना काळात मोफत धान्य वाटप केल्याने त्याचा मोबदला म्हणून शासनाकडून रेशन दुकानदारांना आलेली रक्कम काढून देण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या कळंब येथील महिला नायब तहसीलदाराला सोमवारी लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. सोबतच दोन मध्यस्थी करणाऱ्या दुकानदारांनाही ताब्यात घेण्यात आले.
कोरोनाच्या कालावधीत गरजूंना रेशन दुकानांतून मोफत धान्याचे वाटप करण्यात आले होते. हे धान्य वाटप केल्याने दुकानदारांना प्रतिक्विंटल १५० रुपयांप्रमाणे शासनाकडून बिल दिले जात आहे. कळंब तालुक्यातील एका रेशन दुकानदाराला तीन महिन्याचे ४४ हजार ६२३ रुपये बिल शासनाने मंजूर केले. हे बिल देण्यासाठी कळंब तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार परवीन उमर दराज खान पठाण (४७) यांनी बिलाच्या १५ टक्के म्हणजेच ६ हजार ६९३ रुपयांची मागणी केली होती. यासाठी रास्त भाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष श्रीरंग साधू डोंगरे (६४, रा. कोथळा) व रेशन दुकानदार विलास ज्ञानोबा पिंगळे (रा. पाथर्डी) यांनी मध्यस्थी सुरु केली होती.
दरम्यान, हा सगळा प्रकार तक्रारदार दुकानदाराने लाचलुचपत विभागाचे अधीक्षक प्रशांत संपते यांच्याकडे कथन करत तक्रार दिली. यानंतर संपते यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक गौरीशंकर पाबळे यांनी तक्रारीची शहानिशा करुन सोमवारी दुपारी कर्मचारी इफ्तेकार शेख, विष्णू बेळे, विशाल डोके, अविनाश आचार्य, अर्जुन मारकड, सिद्धेश्वर तावसकर व दत्तात्रय करडे यांच्या सहाय्याने सापळा रचला. यावेळी ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने ६ हजार ७०० रुपयांची लाच देताच या पथकाने लाचखोरांना रंगेहात ताब्यात घेतले. लाचलुचपत विभागाने तिघांनाही ताब्यात घेऊन याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.