कळंब : महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पाची ‘१०८’ रुग्णवाहिका अनेकांना जीवदान देणारी ठरलेली असतानाच रविवारी एका रुग्णवाहिकेमधील डॉक्टर अन् चालकांनी ‘ऑन द वे’ एका महिलेची प्रसूती यशस्वी करत माता व नवजात बालकाला सुखरूप जिल्हा स्त्री रुग्णालयात पोहोचविले.
शासनाचा आरोग्य विभाग नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम, योजना, कार्यक्रम राबवत आहे. असे असतानाही आरोग्य व वाहतुकीच्या सुविधा नसलेल्या भागात तातडीची वैद्यकीय सेवा मिळत नसल्याने किंवा अशा रुग्णांना, संकटातील व्यक्तींना वेळेत दवाखान्यात पोहोचणे शक्य होत नसल्याने जिवाला मुकावे लागल्याच्या घटना घडत होत्या.
यामुळेच शासनाने महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवत सामान्य लोकांना ‘१०८’ ही रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. यात ऑक्सिजन ते ऑक्सिमीटर, गुल्कोमीटर ते थर्मामीटर अशी विविध वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत गरजेची असलेली सामग्री सज्ज असते. या सेवेचा असाच एक चांगला अनुभव रविवारी एका कुटुंबाला आला.
कळंब शहरालगतच्या गावातील एक महिला प्रसूतीसाठी मंगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली होती. यानंतर तेथून जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यासाठी १०८ ला कॉल झाला. काही वेळातच चालक सुनील सगर हे डॉ. प्रवीण शिंदे यांच्यासह मंगरूळ पीएचसीत रुग्णवाहिकेसह दाखल झाले. तेथून त्या गरोदर मातेस घेऊन ते उस्मानाबाद येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाले. परंतु, रुग्णवाहिका रस्ता कापत असतानाच आळणी पाटीपासून त्या महिलेस प्रसूती वेदना होऊ लागल्या. यानंतर उपळा पाटीजवळ गाडी बाजूला घेत डॉ. शिंदे व त्यांचे सहाय्यक सगर यांनी आपले आपत्कालीन सेवेतील कौशल्य वापरत यशस्वी या महिलेची प्रसूती केली. गोंडस मुलाने जन्म दिल्यानंतर माता व नवजात बालकाला सुखरूप जिल्हा स्त्री रुग्णालयात पोहच करण्यात आले.
आपत्कालीन सेवा ठरली मदतगार
आपत्कालीन वैद्यकीय सेवेत दाखल असलेल्या रुग्णवाहिकेत ‘मेडिकल इमर्जन्सी’ गृहीत धरून आवश्यक साहित्य सज्ज ठेवलेले असते. यात डिलिव्हरी किटही असते. शिवाय नियुक्त डॉक्टर, त्यांचा सहाय्यक तथा चालक आपत्कालीन स्थिती हाताळण्यात पारंगत असतात, असे या सेवेचे जिल्हा समन्वयक जयराम शिंदे यांनी सांगितले. याचाच प्रत्यय रस्त्यात झालेल्या या सुखरूप ‘डिलिव्हरी’वरून येतो.