येडशी : उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथे मंगळवारी मध्यरात्री चाेरट्यांनी धुमाकूळ घातला. चार घरे फाेडून सुमारे चार लाखांचा मुद्देमाल लंपास केला. दरम्यान, चाेरट्यांनी केलेल्या मारहाणीत एक महिला गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाेरीच्या या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, गावातील पवनराजे मल्टिस्टेटच्या पाठीमागे नवनाथ विलास काळे यांचे घर आहे. घरातील सदस्य झाेपलेले असतानाच अज्ञात चाेरट्यांनी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुख्य दरवाजाच्या आतील कडी कटावणीच्या साहाय्याने उचकटून आत प्रवेश मिळविला. यानंतर आशा विलास काळे यांना दमदाटी करून चाकूचा धाक दाखवीत गळ्यातील साेन्याचे दागिने लंपास केले. यानंतर चाेरटे बेडरूमकडे गेले. त्यांनी नवनाथ यांना ताेंडावर पांघरूण घेण्यासाठी दमदाटी करून चाकूचा धाक दाखवून पत्नी माधुरी यांच्या गळ्यातील, कानातील व पायातील दागिने असा एकूण ६१ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. यानंतर चाेरट्यांनी मनाेज पाटील यांच्या घराकडे माेर्चा वळविला. कटावणीच्या साहाय्याने दार उघडून घरातील महिला व मनाेज पाटील यांना एकाच घरात काेंडून सुमारे ५७ ग्रॅम साेन्याचे दागिने व १ लाख रुपये, असा एकूण २ लाख १३ हजारांचा ऐवज लंपास केला. यानंतर संबंधित चाेरट्यांनी माजी उपसंरपच गजानन नलावडे, दौंड येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बेद्रे, लालासाहेब दिवाणे, गोपाळ लवटे यांच्या घरीही चोरीचा प्रयत्न केला; परंतु ताे यशस्वी ठरला. यानंतर हे चाेरटे जुन्या रेल्वे स्टेशन परिसरात गेले. तेथील सुजित ताेडकरी यांच्या घराच्या मुख्य दाराच्या आतील कडी कटावणीच्या साहाय्याने उचकटून घरात प्रवेश मिळविला. यावेळी सुजित यांची पत्नी रूपाली ताेडकरी व मुले एकाच खाेलीत झाेपले हाेते. सर्व जण झाेपेत असल्याची संधी साधत चाेरट्यांनी रूपाली यांच्या गळ्यातील २७ ग्रॅम साेन्याचे दागिने व ५७ हजार रुपये राेख, असा एकूण १ लाख २२ हजारांचा ऐवज लंपास केला. यावेळी रूपाली यांनी चाेरट्यांना प्रतिकार केला असता, त्यांना ढकलून देऊन मारहाण केली. यात रूपाली गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर प्राथमिक आराेग्य केंद्रात उपचार करण्यात आले. दरम्यान, ग्रामस्थांनी एका चाेरट्यास पाठलाग करून पकडून चाेप दिला. यानंतर त्यास पाेलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
चाैकट...
पाटील यांच्या घरी दुसऱ्यांदा चाेरी
येडशी गावात यापूर्वीही चाेरीच्या घटना घडल्या आहेत; परंतु अद्याप तपास लागलेला नाही. मनाेज पाटील यांच्या घरी यापूर्वीही चाेरी झाली हाेती. मंगळवारी रात्री पुन्हा त्यांचे घर फाेडले. चाेरीच्या या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच श्वान पथक, तसेच ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले हाेते. सहायक पोलीस अधीक्षक मोतीचंद राठोड, ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक दत्तात्रय सुरवसे, सहायक पोलीस निरीक्षक, बी.डी. नाईकवाडी, अनिल टोंगळे हेकाॅ. भातलवंडे, मुळखेडे आदींनी घटनास्थळास भेट देऊन तपासाला गती दिली.