अस्मिता कांबळे : कळंब तालुक्यातील पहिल्या घरकुल मार्टचे उद्घाटन
कळंब : ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून उद्योग उभा करून आपली प्रगती करावी. स्वतःच्या पायावर उभारून व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिलेच्या पाठीशी जिल्हा परिषद व उमेद अभियान कायम उभे राहील, असे प्रतिपादन जि. प. अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अभियानांतर्गत दहिफळ येथील प्रगती महिला ग्रामसंघाच्या माध्यमातून ‘घरकुल मार्ट’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी भाग्यश्री मते या स्वयंसहाय्यता बचत गटातील युवतीने पुढाकार घेतला आहे. कळंब तालुक्यातील हा पहिलाच उपक्रम असून, याचे उद्घाटन मंगळवारी झाले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास जि. प. च्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, सहायक गटविकास अधिकारी कुसनेनीवार, जिल्हा अभियान व्यवस्थापक समाधान जोगदंड, अमोल शिरसाठ, जिल्हा व्यवस्थापक गुरू भांगे, सरपंच चरणेश्वर पाटील, मीनाक्षी लामतुरे वैद्यकीय अधिकारी, हनुमंत झांबरे ग्रामविकास अधिकारी, सचिन ठोकळ, तेजस कुलकर्णी, शिल्पा पाटील, माजी सरपंच आदींची प्रमुख उपस्थिती होती.
दहिफळ गावातील महिलांकडून कायम मागणी होत असलेल्या ग्रामसंघाच्या कार्यालयासाठी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध केल्यास आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन कांबळे यांनी यावेळी केले. घरकुल मार्टच्या माध्यमातून लाभार्थींना घर बांधण्यासाठीचे सर्व साहित्य एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याचे अभियान समन्वयक समाधान जोगदंड यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी सरपंच शिल्पा पाटील, उपसरपंच अभिनंदन मते, ग्रामपंचायत सदस्य, घरकुल मार्टच्या भाग्यश्री मते, प्रगती महिला उमेद ग्रामसंघाच्या अध्यक्षा अंजली ढवळे, पल्लवी कुटे, कल्पना मते, प्रीती पाटील, श्र्वेता कुटे, पूनम गोरे, स्वाती भातलवंडे, आशा कार्यकर्ती व गावातील महिला उपस्थित होत्या.