उमरगा (जि़उस्मानाबाद) : तालुक्यातील कोळसूर येथील एका ५६ वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लू या आजाराने बळी घेतला आहे़ तर एका व्यक्तीसह इतर दोन महिलांनाही स्वाईन फ्लूची लागण झाल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे़
बदलत्या वातावरणामुळे उमरगा तालुका व परिसरात डेंग्यूसदृश्य आजारासह मलेरिया, कावीळ आदी विविध आजारांचे रूग्ण वाढले आहेत़ मात्र, त्यात आता जीवघेण्या स्वाईन फ्लूची भर पडली आहे़ गत दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील जेवळी येथील एका महिलेला स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले होते़ त्या महिलेवर पुणे येथे उपचार सुरू आहेत़ त्यातच शहरातील डॉ़ विजय पाटील यांच्या रूग्णालयात गत आठवड्यापासून आजतागायत स्वाईन फ्लूचे चार रूग्ण आढळून आले आहेत़ यात एका व्यक्तीसह तीन महिलांचा समावेश आहे़ त्यांचे स्वॅब व इतर तपासणी केल्यानंतर त्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले़ यात कोळसूर (गु़), जेवळी व उमरगा येथील शिवपुरी भागातील दोन रूग्णांचा समावेश आहे़
दरम्यान, कोळसूर येथील एका ५६ वर्षीय महिलेला पुढील उपचारासाठी पुणे येथे नेण्यात आले होते़ मात्र, तेथे त्यांचा १२ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला़ उपचार घेत असलेलेल्या एका व्यक्तीसह इतर दोन महिलांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ़ विजय पाटील यांनी सांगितले़ दरम्यान, स्वाईन फ्लूने एका महिलेचा बळी घेतल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे़
नागरिकांनी दक्षता घ्यावीथंडी, ताप, अंग दुखणे, शौचा, उलट्या आदी लक्षणे आढळून आली तर नागरिकांनी तात्काळ रूग्णालयात जाऊन तपासणी करावी़ स्वाईन फ्लूची लागण झालेल्या रूग्णाच्या कुटुंबातील सदस्यांनी नाकाला रूमाल बांधावा, रूग्णांनी सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये, दक्षता व औषधोपचार घेतल्यानंतर स्वाईन फ्लू आजार निट होतो, अशी माहिती डॉ़ विजय पाटील यांनी दिली़