उस्मानाबाद : येथील स्त्री रूग्णालयातील सोनोग्राफी विभागाच्या कार्यालयाची चावी हरवल्याचा प्रकार आज सकाळी घडला. चावी हरवल्याने तब्बल तीन तास गरोदर मातांना कार्यालयाबाहेर ताटकळत थांबावे लागले़ विशेषत: प्रसुतीसाठी आलेल्या काही मातांना खासगी रूग्णालयात नेऊन सोनोग्राफी करण्याची वेळ नातेवाईकांवर आली. चावी सापडत नसल्याने अखेर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कुलूप तोडून सोनोग्राफी विभागाचे कामकाज सुरू करण्यात आले.
उस्मानाबादेतील स्त्री रूग्णालयात जिल्ह्यातीलच नव्हे तर बार्शी तालुक्यातीलही गरोदर महिला प्रसुतीसाठी येतात. रूग्णालयातील खाटांची संख्या ६० असली तरी दाखल होणाऱ्या महिला रूग्णांची संख्या सरासरी १३० च्या आसपास असते़ परिणामी कधी अपुऱ्या खाटामुळे तर कधी पाण्याअभावी महिला रूग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागतो़ विशेषत: प्रसुतीवेळी लागणारे अनेक साहित्यही बाहेरून आणण्याची वेळ नातेवाईकांवर येत आहे़ आज सकाळी नेहमीप्रमाणे अनेक गरोदर माता सोनोग्राफीसाठी स्त्री रूग्णालयात आल्या होत्या़ सोनोग्राफी कार्यालयाबाहेर तासभर थांबल्यानंतर कार्यालय उघडले जात नसल्याने नातेवाईकांनी कर्मचाऱ्यांकडे विचारपूस करण्यास सुरूवात केली़ त्यावेळी चावी सापडत नसल्याचे सांगण्यात आले़ सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आलेल्या गरोदर माता व नातेवाईक तब्बल ११़३० पर्यंत ताटकाळत थांबले होते़ त्यावेळी काही महिलांना ‘उद्या या’ असा सल्ला देऊन परत पाठविण्यात आले़ काहीजण चावी सापडेल! या आशेवर तेथेच थांबून होते़ तर काहींनी खासगी रूग्णालयात जावून सोनोग्राफी करून घेणे पसंत केले़
शेवटी कुलूप तोडावे लागले साधारणत: १२ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधीक्षकांना चावी सापडत नसल्याची माहिती देण्यात आली़ त्यांच्या सूचनेनुसार एका कर्मचाऱ्याने कार्यालयाचे कुलूप तोडले़ त्यानंतर उपस्थित महिलांची सोनोग्राफी करण्याचे कामकाज सुरू झाले़ दरम्यान, गरोदरपणामध्ये मातांनी काळजी घ्यावी, यासाठी आरोग्य विभागाकडूनच वेळोवेळी जनजागृती केली जाते़ मात्र, कार्यालयाच्या चावीची काळजी संबंधित कर्मचाऱ्याने न घेतल्याने गुरूवारी सकाळी गरोदर मातांना रूग्णालयात ताटकाळत थांबून शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागला़
सूचना दिल्या आहेतवैद्यकीय अधीक्षक आऱपी़वाघमारे म्हणाले, सोनोग्राफी विभागाची चावी सापडत नसल्याची माहिती मिळाल्यानंतर कुलूप तोडून कामकाज सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत़ सोनोग्राफी विभागासाठी नवीन कुलूप आणण्यात येणार असून, महिला रूग्णांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होवू नये, यासाठी कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत़