तुळजापूर (जि़उस्मानाबाद) : श्री तुळजाभवानी देवीच्या मुर्तीचे चरणस्पर्श करून दर्शन देण्याच्या मागणीसाठी येथील स्थानिक महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे़ मकर संक्रांतीदिनी असे दर्शन घेणार असल्याचे कळविल्यानंतर मंदिर प्रशासनाने बंदोबस्त वाढविला व संबंधित महिलांना लेखी पत्र देऊन प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले़ त्यानंतर तूर्त या महिलांनी आपला आग्रह मागे घेतला़
मूर्तीची झीज होत असल्याने चरणस्पर्श दर्शनावर निर्बंध आणण्याची सूचना केली होती़ त्यानुसार तुळजाभवानी देवीच्या चरणस्पर्शावर मंदिर प्रशासनाने निर्बंध आणले आहेत़ दरम्यान, यावर आक्रमक पवित्रा घेत येथील अॅड. मंजुषा मगर व इतर १५ महिलांनी मकर संक्राती दिवशी भोपी महिला पुजाऱ्याप्रमाणे आपणही चरणस्पर्श दर्शन घेणार असल्याचे व यावेळी काही वादंग उद्भवल्यास त्यास मंदिर प्रशासन जबाबदार राहील, असे लेखी कळविले होते़ महिलांच्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मंगळवारी पहाटेपासूनच पोलीस बंदोबस्त वाढविला होता़ दरम्यान, मंदिर प्रशासनाने निवेदनकर्त्या महिलांना लेखी पत्र देऊन हा विषय विश्वस्तांच्या बैठकीत मांडून मार्गी लावण्याचे दिले़ त्यामुळे तूर्त महिलांनी आपली मागणी मागे घेत गाभाऱ्यातूनच दर्शन घेतले़ आता विश्वस्त मंडह यावर काय निर्णय घेते? याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे़
या संदर्भात अॅड. मंजुषा मगर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मंदिर प्रशासनाने विश्वस्तांच्या बैठकीत निर्णय घेऊन आपणास कळविण्यात लेखी दिल्यामुळे चरणस्पर्श दर्शनाचा आमचा आग्रह तूर्त मागे घेतल्याचे सांगितले़तर मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तहसीलदार राहुल पाटील यांनी चरणस्पर्श दर्शनाचा विषय विश्वस्तांच्या बैठकीत ठेऊन मार्गी लावण्यात येणार असल्याचे सांगितले़