कळंब : शहरातील बाबानगर व दत्तनगर भागातील रस्ते तसेच इतर कामांसाठी शासनाने दोन कोटींचा निधी दिला असला तरी प्रशासकीय फेऱ्यातून हा निधी बाहेर पडत नसल्याने ही कामेही रखडली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ही कामे होणार असून, पालिकेने त्या कामांना नाहरकत दिल्याने ‘अडवाअडवीचा’ मुद्दाही मागेच निकाली निघाला आहे.
कळंब शहरातील सर्वात जास्त लोकवस्ती असलेल्या दत्तनगर भागात निधी देताना न. प.ने नेहमी हात आखडता घेतला. न. प.मध्ये कोणाचीही सत्ता असली तरी दत्तनगर निधीपासून वंचित राहिल्याचा अनुभव आहे. या भागातील नाले, रस्ते, राज्यमार्गाला जोडणारे पूल, जलवाहिनी यांची कामे मोठ्या प्रमाणात निधीअभावी रखडली आहेत. त्यासाठी भरीव निधीची तरतूद कधीच करण्यात आली नाही. बाबानगर हा भागही मोठ्या लोकवस्तीचा आहे. या भागाला कळंब -ढोकी राज्यमार्गाशी जोडणारा मुख्य अंतर्गत रस्ता सध्या चिखल, खड्डेयुक्त झाला आहे. या मार्गावर दवाखाने व इतर दुकानेही आहेत. तिथपर्यंत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. हा रस्ता बनवून दोन्ही बाजूने नाली बनवावी, अशी या भागातील रहिवासी, डॉक्टर, व्यापारी मंडळींची मागणी आहे. या रस्त्याला मोठा निधी लागणार असल्याने न. प.ने याचे काम हाती घेतले नव्हते.
याबाबत आ. कैलास पाटील यांनी पुढाकार घेऊन दत्तनगर व बाबानगर भागातील कामासाठी शासनाकडे पाठपुरावा करून २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. त्यामुळे या भागातील कामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा होती. या निधी मंजुरीलाही आता बराच काळ लोटल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मध्यंतरी विकासकामात अडवाअडवीचे प्रकार शहरात राजकीय विरोधातून घडले होते. मात्र, या २ कोटींच्या कामासाठी न. प.तील सत्ताधारी मंडळींनी प्रशासनाला नाहरकत प्रमाणपत्र त्वरित देण्याच्या सूचना देऊन याकामी सहकाऱ्यांची भूमिका घेत विकासकामांना विरोध नसल्याचा चांगला संदेश दिला होता. त्याउपरही ही कामे मार्गी लागत नसल्याचे चित्र आहे.
चौकट -
कामे निविदास्तरावर - आ. कैलास पाटील
कळंब शहरातील २ कोटींची विकासकामे सध्या निविदा प्रक्रियेत असल्याची माहिती आ. पाटील यांनी दिली. ही कामे लवकरच चालू होतील असेही ते म्हणाले.
कोट....या कामांबाबत काही मंडळी न. प.ने नाहरकत दिले नसल्याने कामे चालू झाली नाहीत असे सांगत आहेत. मात्र, न. प.ने सहकार्यांची भूमिका घेत तेव्हाच नाहरकत प्रमाणपत्र बांधकाम विभागाला दिले आहे. विकासकामांत आमची कायम सहकार्याची भूमिका असते. त्यामुळे या कामांना विरोध करण्याचा प्रश्नच नाही.
- सुवर्णा मुंडे, नगराध्यक्ष
कोट......कळंब शहरातील कामांना तांत्रिक मान्यता मिळाली आहे; पण डीएसआरचे दर वाढल्याने त्या कामांची नव्याने निविदाप्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे ही कामे चालू होण्यास अजून किमान १ महिन्याचा कालावधी लागेल.
- सतीश वायर, उपविभागीय अभियंता, सा. बां. उपविभाग, कळंब