उस्मानाबाद : परंडा तालुक्यातील काळेवाडी तलावाच्या भरावाला सुमारे ५० मिटर लांबीपर्यंत अचानक भेग पडली. हा तलाव काठोकाठ भरला असल्याने संभाव्य धोका ओखळून लघु पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिवसभर तळ ठोकून भरावाची दुरूस्ती करण्यासोबतच सांडवा फोडून पाण्याचा विसर्ग सुरू केला.
परंडा तालुक्यातील कोळेवाडी येथे साधारपणे १९७८ मध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून साठवण तलाव उभारण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने हा तलाव काठोकाठ भरला आहे. असे असतानाच प्रकल्पाच्या भरावाला ५० मिटर लांब भेग पडली. ही भेग सोमवारी १ फुट रूंद व तीन मिटर खोल होती. ही माहिती मिळताच जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच कार्यकारी अभियंता कदम, उपअभियंता सुनिल बारसकर यांनी लवाजम्यासह प्रकल्पस्थळी धाव घेत जेसीबीच्या सहाय्याने सांडवा फोडला. या माध्यमातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर ट्रॅक्टर, जेसीबीद्वारे भराव दुरूस्तीचे कामही हाती घेतले. त्यामुळे तुर्तास हा धोका टळल्याचे लघु पाटबंधारे विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
भराव दुरूस्ती हाती घेतली आहेसुरूवातीला भरावाला पडलेली भेग फार लांब नव्हती. परंतु, सोमवारी सकाळी अचानक ही भेग ५० मिटर लांब झाली. रूंदीही वाढत गेली. त्यामुळे कार्यकारी अभियंता कदम यांच्या निर्देशाप्रमाणे प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू केला. तसेच भराव दुरूस्तीही हाती घेतली आहे.- सुनील बारसकर, उपअभियंता, परंडा.