तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : श्री तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करून १५ ते २० महिलांनी शनिवारी संध्याकाळी चरणस्पर्शकरून देवीचे दर्शन घेतले. त्यामुळे काही वर्षांपासूनची दर्शनावेळी तुळजाभवानीचा चरणस्पर्श करू न देण्याची परंपरा खंडित झालीआहे. देवीच्या मूर्तीची झीज होऊ नये म्हणून मूर्तीस्पर्श टाळला जातो.
श्री तुळजाभवानी देवीच्या मूर्तीस स्पर्श करण्याचा अधिकार देवीचे महंत, भोपे पुजारी व सातआणे पाळीकर पुजारी यांनाच आहे. इतरांना पुजाऱ्यांमार्फतच दर्शन दिले जाते. पुजारी देवीच्या चरणांना स्पर्श करून देवीचे कुंकू भाविकांच्या कपाळी लावतात. ही परंपरा मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. देवीची मूर्ती चल आहे. या मूर्तीस वर्षातून तीन वेळा निद्रेसाठी उठवले जाते व तीन वेळेस पूर्ववत सिंहासनावर बसविले जाते. तसेच दररोज सकाळी व संध्याकाळी पंचामृत अभिषेक घातले जातात. २०१२-१३ मध्ये पुरातत्व खात्याने देवीच्या मूतीर्ची झीज टाळण्यासाठी मूर्तीवर पंचामृत अभिषेक करण्यासही बंदी घातली आहे. त्यासाठी मूर्तीच्या चरणावर चांदीच्या पत्र्याचे आवरण लावून देवीस अभिषेक घातला जातो, असे भोपे पुजारी मंडळाचे म्हणणे आहे. शनिवारच्या प्रकाराबाबत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी फोन उचलला नाही.मंदिर व्यवस्थापकांकडे तक्रारतुळजाभवानी देवीची अभिषेक व प्रक्षाळ पूजा झाल्यानंतर शनिवारी सायंकाळी काही स्थानिक महिलांनी देवीच्या गर्भगृहात जावून मूर्तीच्या चरणास स्पर्श करून देवीचे दर्शन घेतल्याचा प्रकार समोर आला. त्याबाबत भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे परमेश्वर यांनी मंदिर संस्थानकडे रविवारी तक्रार दाखल केली आहे. संबंधितांविरूद्ध कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.