उस्मानाबाद : गतवर्षी मान्सूनमध्ये दमदार पाऊस झाले. त्यामुळे प्रकल्पामध्ये मुबलक पाणीसाठा निर्माण झाला. परिणामी, भूजल पाणीपातळीतही वाढ झाली आहे. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या वतीने मार्च महिन्याच्या अहवालानुसार गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्याची भूजल पातळी सरासरी १.३९ मीटरने वाढल्याचे समोर आले आहे.
भूगर्भातील पाणीपातळी मोजण्यासाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेमार्फत जिल्ह्यात एकूण ११४ निरीक्षण विहिरीत निश्चित करण्यात आल्या आहेत. जानेवारी, मार्च, मे व ऑक्टोबर अशा चार वेळा निरीक्षण विहिरीचे सर्वेक्षण केले जाते. रबी हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच मार्चअखेरीस भूजल पातळी नोंदविण्यात येते. यावरून जिल्ह्यामध्ये पिण्याचे दुर्भिक्ष जाणवणार काय याचा अंदाज घेतला जातो. यावरूनच जिल्ह्याचा टंचाई आराखडाही ठरत असतो. यंदा भूजल सर्वेक्षण विभागाकडून जिल्ह्यातील एकूण ११४ विहिरींचे मार्च महिन्यात निरीक्षण करण्यात आले. विभागाकडे पाणीपातळीचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यात नमूद केल्यानुसार, पाणीपातळीमध्ये मागील पाच वर्षांच्या मार्च महिन्याच्या पाणीपातळीच्या तुलनेत मार्च २०२१ मध्ये जवळपास १.३९ मीटरने वाढ झाली आहे. जिल्ह्यात एकूण पाणीपातळी सध्या ९.८३ मीटर आली आहे.
चौकट...
कृषी, जलसंधारणची कामेही ठरली महत्त्वाची
कृषी विभागाच्या वतीने मागेल त्याला शेततळे योजना, जलयुक्त शिवार योजना, सिंचन विहिरीची मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. त्याचबरोबर जलसंधारण विभागाच्या वतीने नाला खोलीकरण, शेततळ्यातील गाळ काढणे आदी कामे करण्यात आली. सिंचनाचे कामे झाल्याने २०२० मध्ये झालेल्या पावसामुळे पाणी जमिनीत मुरले आहे. परिणामी, यावर्षी भूजल पातळी पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत वाढली आहे. पाणी पातळी वाढली असली तरी ती टिकविण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळाणे गरजेचे आहे.
कोट....
जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. शिवाय, विविध विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे जमिनीत पाणी पुरले आहे. त्यामुळे मागील पाच वर्षांच्या तुलनेत मार्च महिन्यात भूजल पातळी १.३९ मीटरने वाढ झाली आहे.
-बी. एम.ठाकूर, वरिष्ठ भूवैज्ञानिक,
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, उस्मानाबाद
तालुकानिहाय निरीक्षण विहिरी व पाणीपातळी मीटरमध्ये
तालुका निरीक्षण विहिरी मीटरमध्ये वाढ
उस्मानाबाद २४ १.१३
तुळजापूर २६ २.७६
उमरगा १७ १.५७
लोहारा ५ १.५७
कळंब १४ १.४१
भूम ७ १.४०
वाशी ७ ०.८८
परंडा १५ १.३९