येरमाळा : कोरोना संसगार्मुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार येथील श्री येडेश्वरी देवीचा यंदाचा शारदीय नवरात्रौत्सव महोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. याबाबत मंदिर समितीने काढलेल्या प्रसिध्दी पत्रकात उत्सवात सर्व विधी केवळ ठराविक पुजारी, मानकरी यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे म्हटले आहे.
श्री तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून श्री येडेश्वरी देवीची ओळख आहे. शनिवार १७ आॅक्टोबर रोजी अश्विन शुध्द प्रतिपदेस घटस्थापनेने देवीच्या शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ होणार आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या पुजारी, मानकरी व पुरोहीत यांच्या उपस्थित घटस्थापना केली जाणार आहे. शिवाय, नवरात्रीतील नऊ दिवसाच्या सर्व महापूजा, होमहावन, विजयादशमी, कोजागीरी पौणीर्मेची विधिवत महापंचोपचार पूजा देखील मोजक्याच म्हणजे २० ते २५ लोकांच्या उपस्थितीत होणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
घटस्थापनेदिवशी भवानी ज्योत घेऊन जाणाऱ्या नवरात्र मंडळांना तसेच नवरात्र काळात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना १२ आॅक्टोबर पासूनच मुख्यमंदीर तसेच परिसरामध्ये तीन किलो मीटर अंतरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याकाळात भाविकांचे कोणतेही वाहन अढळुन आल्यास कायदेशिर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
नवरात्र काळात घटस्थापनेपासून कोजागीरी पौर्णिमेपर्यंत येडेश्वरी मंदिराकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गावातील तसेच पचक्रोशितील भाविकांनी घरीच घटस्थापना करुन देविच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना, पूजा-अर्चा, नैवेद्य दाखवून नवरात्र महोत्सव साजरा करावा, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.