ऑनलाइन लोकमतउस्मानाबाद, दि. 6 - अवैधरित्या सावकारकी करणाऱ्या एका महिलेसह एका इसमाच्या घरी तालुका सहाय्यक निबंधक सहकार विभागानने कारवाई केली़ शुक्रवारी सकाळी केलेल्या कारवाईत कोरे चेक, बॉन्ड, आऱसी़बूकसह खरेदीखत असे लाखो रूपयांचे व्यवहार असलेली कागदपत्रे हाती लागली आहेत़ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका महिलेने सावकाराकडून घेतलेले पैसे परत देऊनही जमिनीची कागदपत्रे मिळत नसल्याची तक्रार तालुका सहाय्यक निबंधक सहकार विभागाकडे केली होती़ या तक्रारीत एका महिला सावकारासह इतर एका सावकाराचे नाव आले होते़ तक्रारदार महिलेची तक्रार दाखल झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधकांच्या मार्गदर्शनाखाली तालुका सहाय्यक निबंधक सहकार विभागातील दोन पथकांनी शुक्रवारी सकाळीच दोन्ही सावकारांच्या घरी एकाच वेळी धडक कारवाई केली़ यात शहरातील साईनगर भागात राहणाऱ्या मनोज विश्वनाथ हिरगुडे यांच्या घरी केलेल्या कारवाईत पाच कोरे बॉन्ड, एक लिहिलेला बॉन्ड, एक नोटरी केलेला बॉन्ड, एका लिहिलेल्या बॉन्डची झेरॉक्स प्रत, दोन कोरे चेक, चार डायऱ्या एक आरसी बूक आदी कागदपत्रे आढळून आली़ तर शहरातील सांजा बायपास रोड भागात राहणाऱ्या आशा सुधीर जाधव या महिलेच्या घरी केलेल्या कारवाईत ८ बॉन्ड, यात चार लिहिलेले, चार कोरे, चार लिहिलेले, एक खरेदीखत, तब्बल २३ बँकांमध्ये खाते असलेले वेगवेगळे पासबूक, ३ भिषीचे व्यवहार असलेले रजिस्टर, एक आरसीबूक आदी लाखो रूपयांच्या व्यवहाराची कागदपत्रे समोर आली़ ही कारवाई पथकप्रमुख तथा सहकार अधिकारी बी.एच.सावतर, मुख्य लिपिक डी.एस.पवार, एस.पी.माळी, एस.जी.माळी, सहाय्यक सहकार अधिकारी रवी देवकते, ए.टी.सोलंकर, पी़आऱ तिडके, एस़आऱमोरे व दुसऱ्या पथकाचे प्रमुख तथा सहकार अधिकारी एस़एऩशिंदे, व्ही.जी.गोरे, ए़एस़पवार, एम.ए़.मोरे, एस.एच.ग़ोरे यांच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने केली. सहकार विभागाने केलेल्या या कारवाईनंतर अवैधरित्या सावकारकी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.तक्रारदाराच्या नावची पावतीही आढळलीआशा सुधीर जाधव या महिलेच्या घरी मारलेल्या धाडीत ज्या महिला तक्रारदाराने तक्रार केली होती़ त्या महिला तक्रारदाराच्या नावे डायरीच्या पानावर लिहिलेले एक लाख ७५ हजार रुपयांची पावती आढळून आली आहे. संबंधित सावकारांची चौकशी सुरू असून, आणखी कोणी तक्रारदार पुढे येतात का? याकडे लक्ष लागले आहे़
महिला सावकारासह दोघा सावकारांच्या घरांवर धाड
By admin | Published: January 06, 2017 8:58 PM