कळंब : मोबाइलमुळे वाचन संस्कृती लोप पावत असून, तरुणांनी मोबाइलपासून दूर राहावे व आयुष्यात ध्येय ठरवून मार्गक्रमण करावे, असे आवाहन हभप महंत भगवान महाराज शास्त्री वरपगावकर यांनी केले.
तालुक्यातील पाथर्डी येथे जगदंब प्रतिष्ठान शाखा व रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण थोरबोले, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.जीवन वायदंडे, साहित्य परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती लक्ष्मण आडसूळ, उद्योजक शरद सावंत, मच्छिंद्र महाराज पुरी, ॲड.मनोज चोंदे उपस्थित होते. यावेळी वायदंडे यांनी कोरोनाचा धोका टळला नसून सतत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन केले. परमेश्वर पालकर यांनी तरुणांनी सकारात्मक विचार अंगी बाळगून विधायक कार्यात सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंडित देशमुख, उपाध्यक्ष अनंत धेले, सचिव प्रताप सावंत, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर पिंगळे, कोषाध्यक्ष वैभव शिंदे, सहसचिव गणेश लांडगे, मार्गदर्शक शरद सावंत, प्रवीण पिंगळे, सल्लागार म्हणून संदीप लांडगे, बंडू सावंत, किशोर लांडगे व सदस्य म्हणून पवन सावंत व इतर सदस्यांची कार्यकारिणी निवडण्यात आली. सदरील कार्यक्रम गावातील ज्येष्ठ नागरिक शिवदास पिंगळे, सुबराव सावंत, बाळासाहेब देशमुख, तुकाराम काकडे, बापूसाहेब पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. प्रास्ताविक उद्योजक शरद सावंत, सूत्रसंचालन काकासाहेब मुंडे यांनी केले.
प्रतिष्ठानची सुरुवात सामाजिक उपक्रमाने
जगदंब प्रतिष्ठानच्या उद्घाटनाच्या दिवशीच या प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात प्रतिष्ठानच्या २२ पदाधिकाऱ्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यास सुरुवात केली, याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. या रक्ताचे संकलन सह्याद्री ब्लड बँकेने केले.