कळंब - शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मंगळवारी मध्यरात्री फेसबुक लाईव्ह करून एकाने अश्लील भाषेत वैयक्तिक नाव घेऊन शिवीगाळ केली. तसेच राज्यातील १४८ आमदारांचा उल्लेख करून त्यांच्याविषयी अपमानस्पद वक्तव्य केले, अशी तक्रार कळंबच्या नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे यांनी कळंब पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यावरून शहरातील एका युवकावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, शहरातील आकाश भागवत चोंदे याने २३ मेच्या मध्यरात्री शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्यासमोर उभे राहून स्वतःच्या फेसबुक पेजवर त्याचे लाईव्ह चित्रण केले. त्या व्हिडीओमध्ये आपल्याविषयी अत्यंत अश्लील व अश्लाघ्य भाषा वापरली. माझ्या जातीचा एकेरी उल्लेख करीत जातीय निर्भत्सना केली. राज्यातील विशिष्ट १४८ आमदारांचा उल्लेख करून त्यांच्याविषयीही अत्यंत हीन भाषा वापरली. ‘‘रस्त्याच्या कामात पैसे खाल्ले’’, असे म्हणून बदनामी केली. हा सर्व प्रकार महिला पदाधिकाऱ्यावर अन्याय करणारा, जातीय तेढ निर्माण करणारा, सार्वजनिक शांततेचा भंग करणारा, राष्ट्रपुरुषाच्या पुतळ्यासमोर बिभत्स वर्तन करून त्यांचा अवमान करणारा असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या फिर्यादीवरून आकाश भागवत चोंदे (रा. आथर्डी रोड, कळंब ) याच्याविरोधात भादंवि कलम ३५४ अ,१५३ अ, २९४, ५०४ व आयटी ॲक्ट ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकीय द्वेष्यातून व्हिडीओद्वारे बदनामी -मुंडमागील वर्षी काही कामाच्या शिफारसी मजूर फेडरेशनसाठी तयार करण्यात आल्या होत्या. त्यापैकी दाेन ते तीन शिफारसी आम्हाला द्या, म्हणून नगरसेविका मीरा चोंदे यांचा मुलगा आकाश चोंदे याने आम्हा पती-पत्नीकडे वारंवार मागणी केली. परंतु पालिकेच्या स्वनिधीतील तूट पाहता तत्कालीन मुख्याधिकारी यांनी त्या शिफारशी स्थगित ठेवल्या. परिणामी ती कामे होऊ शकली नाहीत. त्याचा राग व त्याला इतरांची राजकीय द्वेषातून मिळणारी फूस यातून चोंदे याने तो व्हिडीओ टाकला. हा प्रकार समाेर आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी संबंधितावर कडक कार्यवाही व्हावी, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महिला आयोगाच्या रेखा शर्मा, यशोमती ठाकूर यांच्याकडेही दाद मागणार असल्याचे नगराध्यक्षा मुंडे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.