तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजापूर-लातूर मार्गावरून विदेशी मद्याचे बॉक्स घेऊन कोल्हापूरकडे निघालेल्या एका ट्रकला सोमवारी पहाटे अपघात झाला. तुळजापूरजवळील पाचुंदा तलावानजीक येताच चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक खाली तलावात उलटला. यानंतर, काही तरुणांनी जीव धोक्यात घालत पाण्यात उतरून मद्याचे बॉक्स पळवले. लागलीच पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने पुढील लुटालूट टळली.
कर्नाटकातील हुमनाबाद येथून विदेशी मद्याचे बॉक्स घेऊन एक ट्रक (क्र.टीएस १८ टी ५६२३) हा कोल्हापूरकडे निघाला होता. चालक अनिल महादेव हिंगमिरे व क्लीनर रमेश भारत खडपिडे (दोघे रा.देगलूर, जि.नांदेड) हे ट्रक तुळजापूर मार्गे नेत असताना सोमवारी पहाटे शहराजवळील पाचुंदा तलावानजीक चालकाचे नियंत्रण सुटले. प्रसंगावधान राखून चालक आणि क्लीनरने ट्रकमधून बाहेर उडी घेतली. यानंतर, हा ट्रक तलावातील सुमारे १५ फूट खोल पाण्यात जावून पडला. दारूचा ट्रक पलटी झाल्याची माहिती परिसरात पसरताच, काही तरुण या ठिकाणी जमले. त्यांनी पाण्यात उड्या टाकून ट्रकमधील मद्याचे काही बॉक्स बाहेर काढले. ते पोत्यात भरून त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. काही वेळाने या ठिकाणी पोलीस पोहोचले. त्यामुळे मद्याची लुटालूट टळली. दरम्यान, सायंकाळपर्यंत हा ट्रक तलावातच होता. चालक व क्लीनर हे पोलीस ठाण्यात बसून होते. याबाबत उशिरापर्यंत कोणतीही नोंद तुळजापूर पोलिसांत झालेली नव्हती.
एकाचे पोते जप्त...घटनास्थळी सुरुवातील तीन पोलीस कर्मचारी पोहोचले होते. तेव्हाही तरुणांकडून ट्रकमधील मद्याचे बॉक्स काढणे सुरूच होते. पाठोपाठ या ठिकाणी सहायक पाेलीस निरीक्षक कविता मुसळे या पोहोचल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना पळविले जात असलेले पोते ताब्यात घेण्याची सूचना केली. तेव्हा एका तरुणाकडून बॉक्सने भरलेले जप्त करण्यात आले.
तपास सुरु आहे मद्याचे बॉक्स घेऊन जात असलेला ट्रक पहाटे उलटला आहे. यामध्ये नेमके किती किमतीचे मद्य होते, हे अद्याप कळू शकले नाही. या संदर्भातील पावत्याही ट्रकमध्येच होत्या. सविस्तर माहिती घेऊन घटनेची नोंद करण्यात येणार आहे. हा अपघात आहे की, जाणीवपूर्वक घडविला गेलेला प्रकार, याचाही तपास आम्ही करू.- अजिनाथ काशिद, पोलीस निरीक्षक, तुळजापूर.