उस्मानाबाद : जिल्हा परिषद शिक्षकांच्या वेतनासाठी कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्ट (सीएमपी) प्रणाली लागू करावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून मागील वर्षभरापासून होत होती. अखेर जि. प. कडून ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्यामुळे आता गुरूजींचे वेतन अवघ्या एका ‘क्लिक’वर त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
वेतन वितरणासाठी या प्रणालीचा वापर करणारी उस्मानाबाद ही मराठवाड्यातील तिसरी तर राज्यातील नववी जिल्हा परिषद ठरली आहे. याबद्दल शिक्षकांतून समाधान व्यक्त केले जाऊ लागले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शहरी तसेच ग्रामीण भागात १ हजार ८० शाळा चालविल्या जातात. या शाळांतील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी नियुक्त केलेल्या गुरूजींची संख्याही ५ हजारांपेक्षा अधिक आहे. सर्वात मोठी अस्थापना असलेल्या या शिक्षकांचे वेतन वितरणही तितकेच वेळखाऊ आणि कटकटीचे होते. त्यामुळे शिक्षकांना कधीच १ तारखेला वेतन मिळत नसे. यासाठी ‘सीएमपी’ प्रणाली लागू करावी, अशी मागणी शिक्षक करत होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडूनही मागील वर्षभरापासून याबाबत पाठपुरावा करण्यात येत होता. त्यानुसार जिल्हा परिषदेकडून ही प्रणाली लागू करण्यात आली आहे.
चालू महिन्याचे वेतन याच प्रणालीद्वारे थेट शिक्षकांच्या खात्यावर जमा होणार आहे. या निर्णयाचा ४ हजार ९८० प्राथमिक, २९३ माध्यमिक आणि ३२ केंद्र प्रमुखांना लाभ होणार आहे.