ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.28 -जिल्हास्तरीय पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयाच्या 15 वर्षापासून निधीअभावी रखडलेल्या मुख्य इमारतीच्या बांधकामासाठी 1 कोटी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी 75 लाख रुपयांच्या निधीची तरतूद संगणक प्रणालीवर उपलब्धही झाली आहे. त्यासाठी पाठपुरावा करणारे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुधाकर शिरसाठ यांचा त्यानिमित्त मंगळवारी सत्कार करण्यात आला.
नवीन इमारतीच्या अनिवासी व निवासी बांधकामासाठी 1997 मध्ये राज्य फंडातून 57 लाख मंजूर झाले होते. त्यातून 5 निवासी इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले. मात्र मुख्य इमारतीचे बांधकाम निधीअभावी 2002 पासून अर्धवट अवस्थेत बंद पडले होते. परिणामी गेले 15 वर्ष पशुवैद्यकीय सेवेचे काम छोटय़ा आऊट हाऊसमध्येच सुरू होते.
गेल्या 15 वर्षात 12 उपायुक्त आले, मात्र फारसा पाठपुरावा न झाल्याने अर्धवट बांधकामाचा विषय जिल्ह्यात चर्चेचा बनला होता. परंतु या पदावर डॉ.शिरसाठ रूजू झाल्यानंतर त्यांनी प्रशासकीय पातळी, वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला. त्यामुळे 22 जूनच्या आदेशान्वये 1 कोटी 12 लाखांच्या निधीस प्रशासकीय मंजुरी मिळाली. त्यापैकी 75 लाखाची तरतूद उपलब्ध झाली.
पशुचिकित्सा व्यवसायी संघटना व राजपत्रित पशुवैद्यकीय महासंघ यांनी संयुक्तरीत्या या कार्यक्रमाचे आयोजन केले. पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाचे सहायक आयुक्त डॉ.विठ्ठलराव देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.वाय.बी. साळुंखे यांच्या अध्यक्षतेत व डॉ.देशमुख व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्य सचिव डॉ.संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी डॉ.संजय पाटील, डॉ.एस.एस. भामरे, डॉ.हंसराज देवरे, डॉ.रमण गावीत, राजपत्रित पशुवैद्यकीय अधिकारी महासंघाचे डॉ.संदीप देवरे, डॉ.पवनकुमार कोमलवार उपस्थित होते.