निखिल कुलकर्णी. धुळे
धुळे : महानगरपालिकेने जे काम वारंवार हाती घेऊनही केले नाही, तेच काम पोलीस विभागाने हाती घेतले असून लवकरच ते पूर्णत्वास येणार आहे. शहरात सीसीटीव्ही बसविण्याच्या १ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी मंजुरी दिली आहे. शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांची चिंता वाढली होती. त्याचप्रमाणे दिल्ली येथे घडलेल्या निर्भया अत्याचार प्रकरणानंतर राज्य सरकारने राज्यातील सर्व शहरांना मुख्य चौक व संवेदनशील भागात सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा पोलीस विभागाने शहरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी १ कोटी रुपयांच्या निधीची मागणी जिल्हाधिकार्यांकडे केली होती. जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. मात्र गृह विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र अद्याप प्राप्त झालेले नाही. सदर पत्र प्राप्त होताच शहरातील मुख्य चौक, रस्ते व संवेदनशील भागांचे सर्वेक्षण करून त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले ेजाणार आहेत. शिवाय या कॅमेर्यांचे फुटेज पाहण्यासाठी २४ तास कंट्रोल रूमही सुरू केला जाणार आहे. शहरातील सर्वेक्षणानंतर सीसीटीव्हींच्या संख्येबाबत निर्णय घेतला जाणार आहे. शहरात चेन स्नॅचिंग, विद्यार्थिनींची छेड, हाणामारीच्या घटना रोखण्याबरोबरच चोरी, घरफोड्या थांबविण्यातही पोलीस विभागाला मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर शहरातून होणारी अवैध वाहतूक थांबविण्यासही सीसीटीव्हीमुळे मदत होणार आहे. सीसीटीव्ही बसविण्याबाबत गृह विभागाने यापूर्वीच आदेशित केले असल्याने ना हरकत प्रमाणपत्र लवकरच प्राप्त होण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या या निर्णयामुळे चोरीच्या घटना थांबविण्यास मदत होणार आहे. पोलीस विभागाचे संख्याबळही वाढणे अपेक्षित आहे. शहरात बसविण्यात येणार्या सीसीटीव्हींमुळे महिला अत्याचार थांबविण्याचे आव्हान पोलीस विभागातर्फेअसणार आहे. कारण निर्भया अत्याचार प्रकरणानंतर गृह विभागाने तसे आदेश काढले आहेत. शिवाय तत्कालीन गृहमंत्री स्व. आर.आर. पाटील यांनी महिला अत्याचार रोखण्यासाठी राज्यभरातील संवेदनशील भागात सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश दिले होते. १ कोटी रुपयांमध्ये चांगल्या कंपनीच्या सीसीटीव्हींची निवड करून त्यांना पावसापासून संरक्षणाची सोय करून बसविण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. शहरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी १ कोटी रुपयांच्या निधीचा मागणी प्रस्ताव पोलीस विभागाकडून आला होता. त्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. गृह विभागाची मंजुरी मिळताच सीसीटीव्ही बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.अण्णासाहेब मिसाळ, जिल्हाधिकारी, धुळे धुळे शहर संवेदनशील असल्याने सीसीटीव्ही बसविणे आवश्यक होते. त्यासाठी जिल्हाधिकार्यांना प्रस्ताव सादर केला होता. त्याला मंजुरी मिळाली असून गृह विभागाची एनओसी बाकी आहे. ती प्राप्त होताच सर्व्हे करून काम सुरू केले जाईल.- अखिलेशकुमार सिंह, पोलीस अधीक्षक, धुळे