धुळे : जिल्ह्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे पाणी टंचाईची समस्या जवळपास सुटली आहे. जिल्ह्याची वाटचाल टॅँकर मुक्ततेकडे सुरू आहे. यावर्षी जिल्ह्यात ९९ गावे व ३७ वाड्या मिळून १२८ गावांसाठी तब्बल ८९ टॅँकर व २५० विहिरी अधिग्रहित केल्या होत्या. मात्र आॅगस्ट महिन्याच्या सुरवातीपासून होत असलेल्या पावसामुळे टॅँकरची संख्या कमी झाली असून, आतापर्यंत १२४ गावांचे ८३ गावांचे टॅँकर बंद करण्यात आले आहे. येत्या आठवड्यात अजून काही गावांचे टॅँकर बंद होऊ शकतात अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण व पाणी पुरवठा विभागातून देण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे. २०१८मध्ये सुरवातीचा कालावधी वगळता मध्यंतरीच्या कालावधीत पावसाने दडी मारली होती. त्यातल्या त्यात परतीच्या पावसाने पाठ फिरविली. याचा परिणाम पाणी टंचाईवरही होवू लागला. कमी पावसाचा फटका धुळे, शिंदखेडा व साक्री तालुक्यातील गावांना बसला होता.पावसाअभावी जिल्ह्यात निर्माण होणारी संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे आॅक्टोबर २०१८ मध्येच कृती आराखडा तयार केला. त्यात पाणी टंचाईचे तीन टप्पे करण्यात आले होते. यात आॅक्टोबर ते डिसेंबर २०१८ या दरम्यान १५० गावे तीन वाडे, जानेवारी ते मार्च २०१९ या कालावधीत १२८ गावे १०१ वाडे तर एप्रिल ते जून २०१९ या कालावधीत ५५ गावे व ८९ वाड्यांवर पाणी टंचाई भासू शकेल असा आराखडा होता. जिल्ह्यातील ३३४ गावे व १९३ वाड्यांमधील पाणी टंचाई निवारणार्थ ९ कोटी १५ लाखांचा खर्च मंजूर करण्यात आला होता. यावर्षी उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने, एप्रिल ते जून या तीन महिन्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. सर्वच जलस्त्रोतांनी तळ गाठल्याने, पाण्यासाठी ग्रामस्थांना दिवसरात्र वणवण भटकंती करावी लागत होती. परंतु जिल्हा परिषदेच्या ग्रामीण व पाणी पुरवठा विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांनी नियोजन केल्याने, या भीषण पाणी टंचाईवर काही प्रमाणात मात करण्यात आली. यावर्षी धुळे तालुक्यातील ४० गावे व एक वाडीसाठी ३८ टॅँकर, साक्री तालुक्यातील २४ गावे व ३७ वाड्यांसाठी २८ तर शिंदखेडा तालुक्यातील २७ गावांसाठी २३ टॅँकर असे एकूण १२८ गावे वाड्यांसाठी ८९ पाण्याचे टॅँकर सुरू करण्यात आले होते. आतापर्यंत जिल्ह्यात साधारणत: पाणी पुरवठा करणाºया टॅँकरची संख्या ३० ते ३५ पर्यंत पोहचत होती. त्याचबरोबर ८० ते १०० विहिरी अधिग्रहित करण्यात येत होत्या. मात्र भीषण पाणी टंचाईमुळे यावर्षी टॅँकरची संख्या लक्षणीय वाढली. हा आतापर्यंतचा रेकॉर्ड असल्याचे सांगण्यात आले. यावर्षी पावसाळा सुरू होऊनही तब्बल एक महिना पाऊस नसल्याने, सर्वांचेच डोळे आकाशाकडे लागले होते. पाऊस न झाल्यास भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागू शकते असा अंदाज वर्तविण्यात येत होता. संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन पाणी पुरवठा विभागही सतर्क झालेला होता.जुलै महिन्याची सुरूवात दिलासादायक झाली. या महिन्याच्या सुरवातीला झालेल्या पावसामुळे खरीपाच्या पेरण्या झाल्या. तर काही ठिकाणी पाण्याची समस्या थोडीफार मार्गी लागली.जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सुन सक्रीय झाल्याने दमदार पाऊस झाला. त्यामुळे विहिरी, तलाव भरू लागले. त्यातच आॅगस्ट महिन्यात तर पावसाने कहर केला. साक्री तालुक्यातील पश्चिम पट्टयात झालेल्या दमदार पावसामुळे अक्कलपाडा धरणासह सर्वच नद्या, नाल्यांना पूर आला. त्यामुळे जलपातळी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे अनेक गावांचे टॅँकर बंद करण्यात येऊ लागले. आतापर्यंत झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात थोडेथोडके नव्हे तर तब्बल ८३ टॅँकरच्या फेºया टप्या-टप्याने बंद करण्यात आलेल्या आहेत. आता फक्त चार गावांसाठी सहा पाण्याचे टॅँकर सुरू आहे. यात धुळे तालुक्यातील फागणे, अंबोडे, वडजई व शिंदखेडा तालुक्यातील वरूड-घुसर या गावाचा समावेश आहे. विहिर अधिग्रहितची संख्या घटलीदमदार पावसामुळे केवळ टॅँकरची संख्याच कमी झालेली नाही तर आता अधिग्रहित विहिरींची संख्याही कमी झालेली आहे. यावर्षी तब्बल २५० विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या होत्या. १३ आॅगस्ट १९ अखेरपर्यंत केवळ सात गावांमध्येच विहिरी अधिग्रहित केलेल्या आहे. २४३ विहिरी अधिग्रहित मुक्त करण्यात आलेल्या आहेत. साक्री तालुका टॅँकरमुक्त साक्री तालुक्यात २८ टॅँकर सुरू करण्यात आले होते. हे सर्वच्या सर्व टॅँकर बंद करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेतून देण्यात आली.
जिल्ह्यातील १२४ गावांचे ८३ टॅँकर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 11:27 PM