शिरपूर : शहरातील शिरपूर फाट्यावरील एका लॉजवर चार महाविद्यालयीन तरुण-तरुणींसह, तर करवंद नाकाजवळील एका कॅफेत सहा महाविद्यालयीन तरुण-तरुणींना शिरपूर पोलिसांनी पकडले. ही तरुणाई अश्लील चाळे करताना मिळून आली. ही कारवाई बुधवारी सकाळी करण्यात आली. अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे तरुणांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली.
बुधवारी सकाळच्या सुमारास शिरपूर फाट्यावरील संगीता लॉजवर चार महाविद्यालयीन तरुण-तरुणी असल्याची गोपनीय माहिती दामिनी पथकाच्या प्रमुख पोलिस उपनिरीक्षक छाया पाटील यांना मिळाली. त्यांनी लागलीच दामिनी पथकातील कर्मचारी नूतन सोनवणे, पौर्णिमा पाटील, रोशनी पाटील, प्रभाकर भील यांना घेऊन पाहणी केली असता तेथे दोन मुली व दोन मुले मिळून आले़. त्यांना शिरपूर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यांची दुपारपर्यंत चौकशी करण्यात आली. ही माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताच अनेकांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली.
याचवेळी पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर यांनी करवंद नाका परिसरातील रोज कॅफेवर छापा टाकला असता तेथे तीन महाविद्यालयीन तरुण व तीन तरुणी मिळून आल्या. त्यांनाही पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. दुपारनंतर चौकशी होऊन त्यांना त्यांच्या पालकांना बोलावून समज देऊन सोडून देण्यात आले. यापूर्वी, याच कॅफेवर दामिनी पथकाने काही महिन्यांपूर्वी कारवाई केली होती. आता दुसऱ्यांदा ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
एकाचवेळी कॅफे व लॉजवर शिरपूर पोलिसांनी छापा टाकून प्रेमी युगुलांना अश्लील चाळे करताना रंगेहात पकडले. संबंधित कॅफे व लॉज मालकावर कारवाई करण्यात आली आहे. यापुढे अशा प्रेमी युगुलांसाठी जे जागा उपलब्ध करून देतील अशांवर कडक कारवाई करण्यात येईल. संबंधित मुले-मुलींच्या पालकांना बोलावून समज देण्यात आली, तर मुलींना उपदेशन करण्यात आले.शिरपूरवासीयांना अथवा जे असे कॅफे वा लॉज-हॉटेल चालवितात अशांना आवाहन करण्यात येते की, यापुढे कुठल्याही तरुण-तरुणीला जागा उपलब्ध करून देऊ नका, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर यांनी केले आहे.
शहरातील करवंद नाका परिसरात महाविद्यालयीन तरुणींना बसण्यासाठी कॅफे तयार करण्यात आले आहेत. कॅफे चालक तरुणाईला खास अश्लील चाळे करण्यासाठी विशेष सुविधा देऊन मोठे पैसे मोजतात. कॅफेत लहान-लहान कप्पे तयार करून स्वतंत्र केबीनची व्यवस्था असते.