धुळे : साक्री तालुक्यातील एका गावातील ९ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला धुळे सत्र न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. धुळे येथील सत्र न्यायमूर्ती यास्मीन देशमुख यांनी हा निकाल दिला. गिरप्पा उर्फ गिरधर गोविंदा भामरे (वय ४२) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
साक्री तालुक्यातील एका गावात ९ वर्षांची बालिका व तिचा भाऊ घरी एकटे होते. ही संधी साधून आरोपी गिरप्पा उर्फ गिरधर भामरे याने घरात प्रवेश करून बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ७ सप्टेंबर २०१८ रोजी घडली होती. याप्रकरणी साक्री पोलिसात आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६ सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४ व ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस उपनिरीक्षक अशोक अहिरे यांना गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरोधात आरोप पत्र दाखल केले होते. या खटल्याचे कामकाज न्यायमूर्ती यास्मीन देशमुख यांच्या न्यायालयात सुरू असताना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता शुभांगी डी. जाधव यांनी सरकार पक्षातर्फे ५ साक्षीदारांच्या साक्ष नोंदविल्या. न्यायमूर्ती देशमुख यांनी आरोपीस भादंवि कलम ३७६ खाली १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा तसेच २५ हजाराचा दंड व दंड न भरल्यास ६ महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.