धुळे - जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी ११ कोटी रुपये मंजूर झाले असून, तशी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. लवकरात लवकर धुळे जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे काम सुरू होणार असून, आरटीओ कार्यालयाची सुसज्ज इमारत देवपूर येथील जागेवर उभारली जाणार असल्याची माहिती धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांनी दिली.
जिल्ह्यातील आर.टी.ओ. कार्यालयाचे कामकाज हे गेल्या अनेक वर्षांपासून भाड्याच्या इमारतीतून चालविले जात होते. त्यापोटी राज्य परिवहन विभागाला लाखो रुपये खर्च करावा लागत होता. वाहनाची नोंदणी करण्यासाठी नागरिकांना प्रादेशिक परिवहन कार्यालय गुरुद्वार येथे तर वाहनाची पासिंग करण्यासाठी महामार्गावरील कुंडाणे फाटा येथे जावे लागत होते. सदरचे दोन्ही ठिकाणी हेलपाटे मारावे लागत असल्याने नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत होते. पावसाळ्यात वाहने उभी करायला व पार्किंगलादेखील जागा अपुरी पडत होती. यासारख्या अनेक लहान-मोठ्या समस्या घेऊन धुळे जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी या समस्या घेऊन धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांच्याकडे येत होते, यावर यशस्वी चर्चा होऊन आजवरील प्रश्न मार्गी लागला आहे. आमदार फारूक शाह यांनी याबाबत सातत्याने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे १४ महिन्यांपासून पाठपुरावा करत होते. शुक्रवारी आमदार शाह यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, धुळे जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी ११ कोटी रुपये मंजूर झाले असून, तशी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.