राजेंद्र शर्मा
धुळे - शिवसेना (शिंदे) गटाचे खासदार श्रीकांत शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत गुरुवारी धुळ्यात पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर परत विमानतळाकडे जात असतांना जिल्हा सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी आरक्षणाच्या विषयावरुन रस्त्यावर काळे झेंडे दाखवून निषेध केला. यावेळी पोलिसांनी ११ जणांना अटक केली.
मराठा समाजाला व त्यांच्या सग्या सोऱ्यांना ओबीसीतून आरक्षण न देता, न्यायालयात पुढे न टिकणारे १० टक्के स्वतंत्र आरक्षण दिले ते समाजाला अमान्य आहे,त्याचा निषेध म्हणून जिल्हा सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी विमानतळाकडे परत जाणाऱ्या राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या गाड्याच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी दुपारी चार वाजेच्या सुमारास अटक केली. पोलिसांनी विनोद जगताप,नानासाहेब बगदे, निंबा मराठे, संदीप पाटोळे, राजेंद्र काळे, संदीप सूर्यवंशी, किशोर वाघ, देविदास अप्पाजी गायकवाड,गोविंद वाघ,विशाल सोनवणे,अरविंद भोसले,हेमंत चव्हाण अशा ११ जणांना अटक करण्यात केली आहे.