धुळे : दिव्यांगाच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, माहिती घेऊन आगामी काळात दिव्यांगाच्या ११ योजना धुळे जिल्ह्यात राबविण्यात येतील असे आश्वासन आमदार बच्चू कडू यांनी आज केले.
‘दिव्यांग मंत्रालय दिव्यांगाच्या दारी’ अभियानाचा कार्यक्रम पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात झाला. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. व्यापसीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील, महापौर प्रतिभा चौधरी, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता आदी उपस्थित हाेते.
आमदार कडू पुढे म्हणाले की, सहा देशांनी दिव्यांग कायद्याची अमलबजावणी केली असून, देशात २००३ हा कायदा अमलात आलेला आहे. सुरवातीला दिव्यांगासाठी केवळ तीन टक्केच निधी मिळत होता, आता तो पाच टक्के मिळतो. देशात काही ठिकाणी हा निधी खर्च केला जात नाही. मात्र महाराष्ट्रात दिव्यांगासाठी असलेला निधीखर्च केला जातो. दिव्यांगासाठी विविध योजनाही राज्यात राबविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.