लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : येथील विवेकानंद प्रतिष्ठान रक्तदाता ग्रुपतर्फे रक्त संकलन झालेल्या १५१ बॅगमधून १११ बॅग या २६ रोजी नांदेड जिल्ह्याकरीता रवाना करण्यात आल्या़ दरम्यान, गेल्या आठवड्यात रक्तदान शिबीरात १५१ रक्तदात्यांचे थॅलेसिमियाग्रस्त मुलांसाठी रक्त संकलन करण्यात आले होते़शिरपूर शहरात गेल्या दीड वर्षापासून गरजू रुग्णांना तात्काळ रक्त मिळवून देण्याचे कार्य येथील विवेकानंद प्रतिष्ठान रक्तदाता ग्रुपतर्फे केले जात आहे़ तसेच हा ग्रुप संपूर्ण महाराष्ट्रामधील ग्रुप सोबत जोडून कार्य करत आहे. या ग्रुपमार्फत गेल्या दीड वर्षात अनेक गरीब, गरजू रुग्णांना तात्काळ वेळेवर रक्त मिळवून देण्यात आले आहे. तसेच सध्या कोरोना महामारीचे संकट संपूर्ण महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरात आहे अशा परिस्थितीमध्ये रक्ताची कमी आणि त्यातल्या त्यात थॅलेसिमिया रूग्णांना मोठया प्रमाणात भासणारी रक्ताची कमी लक्षात घेता विवेकानंद प्रतिष्ठान रक्तदाता ग्रुप शिरपूरमार्फत गेल्या आठवड्यात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.विवेकानंद प्रतिष्ठान रक्तदाता ग्रुपचे कैलास कोळी, भूषण ईशी, अमोल पाटील, क्रिष्णा पाटील, मयुर बडगुजर, अजिंक्य शिरसाठ, महेंद्र पाटील, राकेश मोरे, अमोल शिंदे यांनी रक्तदान शिबीर आयोजित करून १५१ रक्तदातांचे थॅलेसिमियाग्रस्त मुलांसाठी रक्त संकलन केले. या शिबीरासाठी तालुक्यातील माजी सैनिक, विधवा सैनिक पत्नी संघ व स्व.मुकेशभाई पटेल ब्लड बँक यांचे अनमोल सहकार्य लाभले़२६ रोजी विवेकानंद प्रतिष्ठान रक्तदाता ग्रुपतर्फे रक्त संकलन झालेल्या १५१ बॅगमधून १११ बॅग या नांदेड जिल्ह्यातील थॅलेसिमिया रूग्णांसाठी रक्ताच्या बॅग रवाना करण्यात आल्या़
नांदेडला रक्ताच्या १११ बॅग रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 10:31 PM