धुळे,दि.26- तालुक्यातील जुनवणे ग्रामपंचायतील 12 लाख 65 हजार 942 रूपये शासकीय निधीचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी दोन तत्कालीन ग्रामसेवकांविरूध्द तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े रोजगार हमी योजना व निर्मल भारत अभियान या योजनांमधील निधीचा बनावट दस्तऐजव तयार करून हा अपहार करण्यात आला आह़े
धुळे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भगवान वाल्मीक पाटील (रा़ प्लॉट नं़ 37 सुर्यानगर, वलवाडी शिवार, देवपुर) यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आह़े त्यानुसार जुनवणे ग्रामपंचायतील सुरेखा भिवसन ढोले (रा़ प्लॉट नं़ 43 अक्षय कॉलनी, वलवाडी शिवार) व संदीप जिजाबराव बागल (रा़ प्लॉट नं़ 42 बोरसे नगर, गोंदूर रोड, देवपुर) हे ग्रामसेवक म्हणून असतांना त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी व कर्तव्य पार पाडतांना त्यांनी जाणीवपुर्वक शासनाच्या नियमांची पायमल्ली केली़ त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना व निर्मल भारत अभियान या योजनांमध्ये एकूण 12 लाख 65 हजार 942 रूपयांच्या शासकीय निधीचा बनावट दस्ताऐजव तयार करून अपहार केला़ तसेच शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.