शिरपूर,दि.16- तालुक्यातील करवंद येथे शनिवारी रात्री सुरू असलेल्या गोंधळाच्या कार्यक्रमात दगडफेक केल्या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी 12 जणांना अटक केली आहे. याप्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले आहे. तर शिरपूर येथील क्रांतीनगरात बॅनर फाडल्या प्रकरणीही स्वतंत्र गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, करवंद गावात दुस:या दिवशीही तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वातावरण चिघळू नये, म्हणून पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे जाहीर केलेली नाही.
जातीवाचक शिवीगाळ व दगडफेक प्रकरणी गुन्हा
विक्की साहेबराव वाघ (रा. करवंद) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की शनिवारी रात्री आठ वाजता एका पुतळ्याजवळ बसलेलो असताना 50 ते 60 लोक तेथे आले. त्यांनी फिर्याद का दिली? असे विचारत जातीवाचक शिवीगाळ करीत दगडफेक केली.
शिरपूर येथे बॅनर फाडल्याने तणाव
करवंद गाव समाजकंटकांनी केलेल्या कृत्यामुळे पेटलेले असताना शिरपूर शहरात रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास क्रांतीनगरात चार चाकी गाडी फोडून बॅनर फाडल्याची घटना घडली. यानंतर संशयित आरोपींनी दगडफेक केली. याप्रकरणी 20 ते 25 जणांविरद्ध गुन्हा दाखल झाला आहे.