धुळे - भाविकांचे श्रद्धास्थान असलले महाराष्ट्रातील साडेतीन पीठापैकी एक शक्तीपीठ म्हणून गणल्या जाणाऱ्या सप्तश्रृंगी देवीच्या चैत्र यात्रोत्सवास प्रारंभ झालेला आहे. यात्रोत्सवात गडावर देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड आहे. भाविकांच्या सोयीसाठी एस. टी. महामंडळाच्या धुळे जिल्ह्यातील पाचही आगारांमार्फत नांदुरी गडासाठी ३० मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत १४० जादा बसेस सोडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे धुळे व शिरपूर येथून दर पंधरा मिनिटांनी बस सोडण्यात येणार आहे.
सप्तश्रृंगी गडावर चैत्र महिन्यात यात्रा भरत असते. या यात्रोत्सवादरम्यान खान्देशातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी गडावर असतात. यातील काही पायी तर काही महामंडळाच्या बसने गडावर जातात. गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी महामंडळातर्फे दरवर्षी जादा बसेस सोडण्यात येत असतात. यावर्षीही धुळे विभागातर्फे नांदुरीगडासाठी आगारनिहाय जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.३० मार्च ते ५ एप्रिल २०२३ अशा ७ दिवसांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आगारनिहाय सोडण्यात येणाऱ्या बसेस अशा- धुळे ४० बसेस, शिरपूर ४०, साक्री-३०, शिंदखेडा- २०, दोंडाईचा -१०, अशा एकूण १४० बसेस सोडण्यात येणार आहे.