लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : वनविभागाच्या हद्दीतील विहिर खोदण्याची परवानगी देण्यासाठी १५ हजाराची लाच मागणारा सर्वेक्षक मनोहर दौलत जाधव याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले़ शिवतिर्थाजवळील वन विभागाच्या मुख्य कार्यालयात शुक्रवारी दुपारी अटक करण्यात आली़ खुडाणे गाव दुष्काळ सदृश्य असून गावात पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई आहे़ वनविभागाच्या अंतर्गत असलेल्या गटात लोकसहभागातून घटबारी पाझर तलाव निर्माण केलेला आहे़ तलावाच्याखाली सिंचन विहिर खोदकामासाठी ग्रामपंचायतीने प्रस्ताव तयार करुन पंचायत समिती साक्री येथे वनदावा विहिर खोदकामाचे प्रकरण दाखल केले होते़ हे प्रकरण कोंडाईबारी वन विभाग यांना दिल्याने या जागेचा पंचनामा, जीपीएस नकाशा, हात नकाशा काढून वनदावा प्रकरण वनविभागाकडे जमा करण्यासाठी दिले होते़ तक्रारदार याने हे प्रकरण धुळ्यातील सर्वेअर मनोहर दौलत जाधव यांची भेट घेतली़ त्यावेळी कागदपत्र अपूर्ण असल्याचे सांगून विहिर खोदण्याच्या प्रकरणात परवानगी मिळवून देण्यासाठी मदत करतो असे सांगत २५ हजार रुपये लाचेची मागणी केली़ तडजोडीअंती १५ हजार रुपये लाचेची मागणी करत असल्याचे पडताळणीतून निष्पन्न झाले़ शुक्रवारी दुपारी उप वनसंरक्षक धुळे येथे सापळा लावण्यात आला असता १५ हजार रुपये घेताना मनोहर जाधव याला रंगेहात पकडण्यात आले़ ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवन देसले, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर व त्यांच्या पथकातील नरेंद्र कुलकर्णी, जयंत साळवे, संतोष हिरे, कृष्णकांत वाडीले, सुधीर सोनवणे, संदिप सरग, कैलास जोहरे, प्रशांत चौधरी, सतीष जावरे, भूषण खलाणेकर, शरद काटके, प्रकाश सोनार, संदीप कदम, सुधीर मोरे यांनी ही कारवाई केली़
सर्वेक्षकाला भोवली १५ हजाराची लाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 11:03 PM