दोंडाईचा : नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणा:या कापसाला अपेक्षेपेक्षा कमी भाव मिळाल्याने दोंडाईचा परिसरात मिरचीचे क्षेत्र वाढले आहे. निसर्गाची कृपा व अन्य बाजार समिती क्षेत्रातील शेतकरी दोंडाईचा बाजार समितीकडे वळल्याने दोंडाईचा बाजार समितीत गतवर्षापेक्षा सुमारे 15 पट मिरचीची आवक वाढली असून यंदा 59 हजार 786 क्विंटल मिरचीची आवक आहे. गेल्यावर्षी म्हणजे 2015-16 या आर्थिक वर्षात 3 हजार 888 क्विंटल म्हणजे एक कोटी 15 लाख 33 हजार 940 रुपयांची उलाढाल झाली आहे. तर या वर्षी 59 हजार 786 क्विंटल मिरचीची आवक झाली असून उलाढाल 12 कोटी 63 लाख 77 हजार 860 रुपयांची उलाढाल झाली आहे. येथील बाजारात मिरचीला सुरुवातीला 1700 ते 1800 रु. प्रतिक्विंटल भाव होता. नंतर आवक वाढली तर भाव सुद्धा वाढले असून सध्या 2966 रु. प्रतिक्विंटल भाव मिरचीला मिळत आहे.दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती मिरचीच्या उलाढालीत आघाडीवर आहे. येथील मिरची उद्योग प्रसिद्ध आहे. दोंडाईचा परिसरात मिरचीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. दोंडाईचा येथील मिरची भारतासह इराण, इराक, सौदी अरेबियाला पाठवली जात असे. परंतु मध्यंतरी मिरची उत्पादन व मिरची उद्योगालाही घरघर लागली होती. बाजार समितीत मोठय़ा प्रमाणात आवक वाढल्याने मिरची उद्योगातून शेकडो अकुशल कामगारांना रोजगार मिळाला आहे. दोंडाईचा शहराच्या पूर्व दिशेला म्हणजे शिंदखेडा रस्त्यावर मिरचीच्या पथारी आहेत. या पथारीवर शेकडो कामगारांना रोजगार मिळाला आहे. काही वर्षापासून निसर्गाची अवकृपा, अवकाळी पाऊस यामुळे मिरचीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. बुरशीजन्य रोगामुळे मिरचीचे उत्पादन घटले होते. बदलत्या हवामानामुळे शेतकरीही मिरची लागवड टाळत होता. बियाणे महाग त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याची तक्रार होती. त्यामुळे साहजिकच मिरची उत्पादन घटले होते. महत्त्वाचे म्हणजे दोंडाईचा परिसरातील शेतकरी कापूस लागवडीपासून लांब जात आहे. कापूस नगदी पीक म्हणून ओळखले जात असले तरी कापसाला अपेक्षित भाव न मिळाल्याचे शेतक:यांचे म्हणणे आहे. पैसेही रोख मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकरी साहजिकच कापसापासून दूर गेला. बागायतची सोय असलेला शेतकरी मिरची लागवडकडे वळला आहे. वर्ष आवक 2010-11 21 हजार 865 क्विंटल 2011-12 40 हजार 386 क्विंटल 2012-13 32 हजार 652 क्विंटल 2013-14 16 हजार 335 क्विंटल 2014-15 4 हजार 649 क्विंटल 2015-16 3 हजार 888 क्विंटल2016-17 यावर्षी आतापावेतो 59 हजार 786 क्विंटल मिरचीची आवक झाली आहे. गत वर्षापेक्षा तब्बल 15 पट मिरचीची आवक वाढली असल्याची माहिती बाजार समिती चेअरमन नारायण पाटील, सचिव पंडित पाटील यांनी दिली आहे.
गतवर्षापेक्षा 15 पट मिरचीची आवक वाढली
By admin | Published: February 02, 2017 1:03 AM