लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील शुन्य ते सहा वर्षे वयोगटातील कमी वजनाच्या बालकांना सर्वसामान्य मुलांच्या श्रेणीत आणण्यासाठी अंगणवाडीस्तरावर ग्राम बाल विकास केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहेत. या केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील ४६६ पैकी १६२ बालके ही सर्वसाधारण श्रेणीत (कुपोषणमुक्त) झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातून देण्यात आली.कुपोषणमुक्ततेसाठी राज्य शासनाने विशेष प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्यानुसार कुपोषित बालकांच्या श्रेणी संवर्धनाची जबाबदारी महिला व बालविकास विभागाकडे देण्यात आली आहे.जिल्ह्यातील शुन्य ते सहा वर्षे वयोगटातील कमी वजनाच्या बालकांना सर्वसामान्य मुलांच्या श्रेणीत आणण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी अंगणवाडी स्तरावर ग्रामबालविकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत.जिल्ह्यात बालकांची तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. त्यात ४८३ तीव्र, ९९९ मध्यम अशी एकूण १४८२ बालके कुपोषित आढळली होती.या बालकांना सर्वसाधारण मुलांच्या श्रेणीत आणण्यासाठी त्यांना २३२ अंगणवाड्यांमधील ग्राम बालविकास केंद्रात जून ते आॅगस्ट १८ या कालावधीत दाखल करण्यात आले होते. दाखल करण्यात आलेल्या बालकांना १२ आठवडे पोषक आहार देण्यात आला. या बारा आठवड्यांमध्ये प्रत्येक आठवड्याला बालकांचे वजन तपासण्यात आले होते.तीन महिन्यानंतर त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली होती. त्यात अनेक बालकांमध्ये सुधारण झाल्याचे दिसून आले.४६६ तीव्र कुपोषित बालकांपैकी १६२ बालके हे सर्वसाधारण श्रेणीत म्हणजे कुपोषणमुक्त झाले आहेत. तर २४३ बालक हे तीव्रमधून मध्यम स्वरूपात आले आहे. मात्र ६१ बालकांमध्ये कुठलही सुधारणा होऊ शकलेली नाही.तीव्र कुपोषितमधून सर्वसाधारण श्रेणीत आलेल्या बालकांची टक्केवारी ३४.७६, तीव्रमधून मध्यमस्वरूपात आलेल्या बालकांची टक्केवारी ५२.१५ तर सुधारणा होऊ न शकलेल्या बालकांची टक्केवारी १३.०९ एवढी आहे.३४५८ कुपोषित बालके आढळलीजिल्ह्यात सप्टेंबर-आॅक्टोंबर महिन्यात कुपोषित बालकांची शोध मोहीम राबविण्यात आली होती. त्यात ३ हजार ४५८ बालके ही तीव्र कुपोषित बालके आढळली होती. या बालकांना १ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ग्राम बालविकास केंद्रांमध्ये दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या बालकांना ग्राम बालविकास केंद्रात दाखल केल्यानंतर त्यांना १२ आठवडे सकस आहार दिला जाणार आहे. त्यामुळे या बालकांमध्येही सुधारणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ग्राम बालविकास केंद्रांमुळे कुपोषित बालकांची संख्या कमी होण्यास मदत होत आहे.
जिल्ह्यातील १६२ बालक झाले कुपोषणमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 9:37 PM