ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.23 - ग्रामीण भागामध्ये धोकादायक वर्गखोल्यांमध्ये बसून विद्याथ्र्याना शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने सर्वशिक्षा अभियानच्या बजेटमध्ये या वर्गखोल्यांच्या बांधकाम व मोठय़ा दुरुस्त्यांसाठी 2 कोटी 10 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
या धोकादायक वर्गखोल्या व मोठय़ा दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. यासंदर्भात संबंधित शाळांना शिक्षण विभागाकडून सूचनाही देण्यात आल्या आहेत.
24 धोकादायक वर्गखोल्या
जिल्ह्यामध्ये एकूण 24 धोकादायक वर्गखोल्या पाडून त्याठिकाणी नवीन बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी 1 कोटी 86 लाख 48 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. एका वर्गखोलीसाठी 7 लाख 77 हजार रुपयेप्रमाणे हा निधी वितरित करण्यात येणार आहे. यामध्ये धुळे तालुक्यासाठी 6 वर्गखोल्या मंजूर करण्यात आल्या आहेत. यासाठी 46 लाख 62 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. धुळे तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळा नाणे येथे दोन, बोरकुंड नं.1 येथे चार वर्गखोल्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत.
शिंदखेडा तालुक्यासाठी 11 वर्गखोल्या मंजूर करण्यात आल्या आहेत. यासाठी 85 लाख 47 हजार मंजूर करण्यात आले आहेत. या तालुक्यामध्ये तावखेडा प्र.ब.साठी दोन वर्गखोल्या मंजूर करण्यात आल्या आहेत. तर जिल्हा परिषद शाळा कर्ले येथे चार, निशाने येथे दोन, परसुले येथे तीन वर्गखोल्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत. शिरपूर तालुक्यासाठी एकूण 7 वर्गखोल्या मंजूर झाल्या आहेत. यासाठी 54 लाख 39 हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. शिरपूर तालुक्यात खैरखुटी येथे दोन वर्गखोल्या, मोहिदा येथे दोन, पुरखळी येथे एकुण तीन वर्गखोल्या मंजूर करण्यात आल्या आहेत. धोकादायक वर्गखोल्यांचे बांधकाम कोणत्याही परिस्थितीत 30 डिसेंबर्पयत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मोठय़ा दुरुस्त्या (प्राथमिक)
प्राथमिक विभागातील वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी 18 लाख 78 हजार रुपये मंजूर झाले आहेत. मोठय़ा दुरुस्तीचे काम 30 जूनर्पयत कोणत्याही परिस्थितीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.