धुळे, दि.2- चाळीसगाव रोड पोलिसांनी सोमवारी सायंकाळी 6 पोत्यांमध्ये भरलेला 200 किलो कोरडा भांग व वाहन असा तीन लाख 40 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून एकास ताब्यात घेतले तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाला.
इंदूरकडून धुळ्याकडे येत असलेल्या एका कारमध्ये भांग असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सोमवार 1 मे रोजी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास इंदूरकडून एमएच 39 जे 1478 क्रमांकाची कार धुळे शहरात येत होती. ती पोलिसांनी चाळीसगाव रोडवरील कब्रस्तानजवळ थांबविली़ त्या कारची तपासणी केली असता त्यात 6 पोत्यांमध्ये तब्बल 200 किलो कोरडा भांग असल्याचे आढळल़े त्याची किंमत सुमारे 40 हजार रुपये आणि ताब्यात घेतलेल्या कारची किंमत 3 लाख रुपये असा एकूण 3 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला़
या प्रकरणी सिध्दार्थ रवींद्र राणा (रा़ माधवपुरा पालाबाजार) आणि त्याचा जोडीदार राजेशभाऊ यांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आल़े त्यातील राजेश हा पळून जाण्यात यशस्वी झाला़ याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे प्रेमराज पाटील यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल आहे. पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगावरोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अरुण शिंदे, सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र शिरसाठ यांच्यासह प्रभाकर बैसाणे, ज़े ए़ पठाण, साहेबराव भदाणे, प्रेमराज पाटील, शंकर महाजन यांनी ही कारवाई केली.