साक्री - तालुक्यातील साक्री-गंगापूर या वनविभागाच्या हद्दीत ट्रकसह २१ लाख ६६ हजार रुपये किमतीचे काळ्या रंगाचे रसायन (आॅईल) जप्त करण्यात आले. ही कारवाई बुधवारी पहाटे साक्री पोलिसांतर्फे करण्यात आली. हे रसायन विषारी असल्याचे माहिती असूनही हलगर्जीपणाने सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीत टाकून विल्हेवाट लावल्याचेही आढळले. याप्रकरणी बुधवारी रात्री उशीरा सात जणांविरूद्ध साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये मुंबईसह मध्यप्रदेश राज्यातील आरोपींचा समावेश आहे. या प्रकरणी इच्छापूरचे पोलीस पाटील दादाजी मारनर यांनी साक्री पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार साक्रीपासून १२ कि.मी. अंतरावरील अक्कलपाडा धरणाच्या पात्रात बुधवारी मध्यरात्री एमएच १८ बीजी ६७०९ या ट्रकमध्ये २०० लिटर क्षमतेचे १०० लोखंडी ड्रम होते. आरोपींनी संगनमताने त्यात भरलेले तपकिरी-काळ्या रंगाचे रसायन (आॅईल) ते विषारी तसेच अग्निजन्य द्रव असल्याचे माहिती असून देखील हलगर्जीपणे नागरिकांच्या पिण्याच्या तसेच शेतकीकरीता उपयुक्त असलेल्या जलसाठ्यात टाकून तो दूषित केला. गैरकायदेशीर कामाच्या उद्देशाने आणून या रसायनाची विविध ठिकाणी विल्हेवाट लावली. तसेच ट्रकमालकाच्या संमतीशिवाय हा माल परस्पर भरून विक्री करून त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी १ लाख २६ हजार रुपये किमतीचे ६० लोखंडी ड्रम जप्त केले. त्यात तपकिरी काळ्या रंगाचे रसायन भरले असून प्रतिलिटर १० रुपये व लोखंडी ड्रम प्रत्येकी १०० रुपये अशी किंमत आहे. तसेच ६ लाख ३० हजार रुपये किमतीचे २०० लिटर क्षमतेचे ३०० लोखंडी ड्रम त्यातही तपकिरी काळ्या रंगाचे रसायनच भरले आहे. यासोबत एमएच १८ बीजी ६७०९ या क्रमांकाचा १४ लाख १० हजार रुपये किमतीचा ट्रक असा एकूण २१ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक मोहिनोद्दीन कुदशद्दीन शहा (३८) रा. टेगोर, सेंधवा, जि.बडवानी (मध्य प्रदेश), क्लिनर देवेंद्र शोभाराम चव्हाण (३०) तलकपुरा, जि.खरगोन, रमेश सरग रा.साक्री, बबलु यासीन शेख रा.गौशियानगर, पिंपळनेर, हॉटेल राजकमलचा मालक (नाव, गाव माहिती नाही), नवी मुंबई वाशी गल्ला मार्केट येथील महालक्ष्मी ट्रान्सपोर्टचे मालक अनिलभाई, रा. नवी मुंबई व सलीमभाई रा.मुंब्रा या सात जणांविरूद्ध भादंवि कलम ४०६, ४२०, २७७, २८४, २८५, ३४ प्रमाणे साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.