राजेंद्र शर्मा
धुळे: शहरातील देवपूर भागात असलेल्या श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या लॅाकरमध्ये असलेले सुमारो २१ लाख ७५ हजार रूपयांचे दागिने पतसंस्थेतील कर्मचाऱ्यानेच लांबविल्याची घटना १६ मे २३ पूर्वी घडली. याप्रकरणी देवपूर पोलिसात एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संशयित आरोपी फरार झालेला आहे.
याबाबत पतसंस्थेचे चेअरमन रवींद्र वसंत खानकरी (वय ६८, रा. देवपूर धुळे)यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, श्रीराम पतसंस्थेच्या लॅाकरमध्ये कर्जदारांचे जवळपास २८९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तारण म्हणून ठेवलेले होते. पतसंस्थेतील कर्मचारी शालिग्राम सुभाष येवलेकर (वय ३५, रा. योगेश्वर कॅालनी, देवपूर धुळे) याने सभासद व संचालकांचा विश्वासघात करून लॅाकरमध्ये ठेवलेले दागिने लंपास केले. याप्रकरणी देवपूर पोलिसात संशयित शालिग्राम येवलेकर याच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, तपास पोलिस उपनिरीक्षक इंदवे करीत आहेत.
घटनेची माहिती मिळताच, अपर पोलिस अधीक्षक किशोरकाळे, सहायक पोलिस अधीक्षक त्रृषिकेश रेड्डी, देवपूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक मोतीराम निकम यांनी पतसंस्थेत भेट देऊन पहाणी केली.